देसाईंच्या गडात उद्या आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray today in MLA Shambhuraj Desais Patan constituency

देसाईंच्या गडात उद्या आदित्य ठाकरे

मल्हारपेठ - शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर निष्ठा यात्रेचा प्रारंभ केला आहे. त्यातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी (ता. २) ठाकरेंची निष्ठा यात्रा माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघातील मल्हारपेठेत येणार आहे. या सभांतून ते आमदार देसाईंवर कोणती तोफ डागणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. त्यामध्ये दोन आमदार आणि स्वतः एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्याने ठाकरेंच्या या दौऱ्यावर राज्याचे लक्ष आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येऊन आमदार देसाई हे पाटण मतदारसंघाचे, तर आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आमदार देसाई यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच बहरली. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊन राज्यमंत्रीही झाले होते. त्यांच्या बंडखोरीनंतर पाटण तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांना वाऱ्यावर न सोडता पक्षाची ध्येय-धोरणे तळागळातील निष्ठावंतांपर्यंत पोचवण्यासाठी ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ गाव महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब हे आहे. आता मंगळवारी आदित्य ठाकरे या तिघांवर जोरदार तोफ डागणार का, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. निष्ठा यात्रेचा पहिला टप्प्या मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी केल्यानंतर दुसरा टप्पा उद्या (सोमवारी) आणि मंगळवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पाटण, सातारा, पुणे येथे असणार आहे.

निसरे फाटा येथे होणार स्वागत

पाटण मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्‍ल्यात आदित्य ठाकरे येणार आहेत. निसरे फाटा येथे निष्ठा यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून तेथून मल्हारपेठपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तेथे ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथून ते उंब्रजमार्गे पुण्याकडे रवाना होतील, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी सांगितले.

Web Title: Aditya Thackeray Today In Mla Shambhuraj Desais Patan Constituency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top