खासगी क्‍लासेस संघटनेची साताऱ्यात धरणे; सात महिन्यांपासून क्‍लासेस बंद

प्रशांत घाडगे
Thursday, 29 October 2020

खासगी क्‍लासेसचा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, क्‍लासचालकांना मुद्रा लोन देण्यास परवानगी मिळावी, सोशल डिस्टस्निंगचे पालन करून एका बेंचवर एक विद्यार्थी बसवित शिकवणी घेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे खासगी क्‍लासेसचे शिक्षक आर्थिक विवंचनेत असल्याने नियमांचे बंधन घालून एक नोव्हेंबरपासून क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी प्रताप चव्हाण, सोहेल सुभेदार, केशव वाघ, बाळकृष्ण चोरे, दिलीप बरकडे आदी उपस्थित होते. खासगी क्‍लासेसचा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, क्‍लासचालकांना मुद्रा लोन देण्यास परवानगी मिळावी, सोशल डिस्टस्निंगचे पालन करून एका बेंचवर एक विद्यार्थी बसवित शिकवणी घेण्यास परवानगी द्यावी, तसेच मागील 14 नोव्हेंबरपर्यत खासगी शिकवणी बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. 

सातारा तहसील कार्यालयात विनापावती वसुली; नागरिकांची लूट

ज्या शिक्षकांनी क्‍लासेसची इमारत भाड्याने चालविण्यास घेतली आहे. त्यांचे लाखो रुपयांचे भाडे थकीत आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून बाहेर येण्यास व विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण टाळण्यासाठी क्‍लासेसला परवानगी द्या, अशा मागण्या असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation Of Private Classes Association In Front Of Satara District Collector Office Satara News