विलासकाका म्हणजे, ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील, प्रबाेधनाचा वारसा जपणारे नेतृत्व; मान्यवरांची भावना

विलासकाका म्हणजे, ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील, प्रबाेधनाचा वारसा जपणारे नेतृत्व; मान्यवरांची भावना

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज (साेमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. उंडाळकरांना राज्यातील विविध नेत्यांसह नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भाेसले, डाॅ. इंद्रजीत  माेहिते आदींनी विलासराव पाटील यांच्या विषयीच्या भावनेला वाट माेकळी करुन दिली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विलासकाका यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विलासकाकांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वं केलं. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील.

आज दुपारी उंडाळे येथे माजी मंत्री उंडाळकर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार 

कराड तालुका आणि काँग्रेस कराड तालुका आणि स्वातंत्र्य चळवळ यांचे नात गौरवच आहे. काँग्रेसचे निष्ठावंत व सहकारातील राजकारणी विलासराव (काका)  पाटील- उंडाळकर यांचे जाणे हे सातारा जिल्ह्यातील विचार विश्र्वामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा प्रबोधन दीप विझला, असेच म्हणावे लागते अशी भावना सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली.

राऊत म्हणाले, कराड तालुक्याचे सातारा जिल्ह्यावर सहकाराचे नेतृत्व दीर्घकाळ टिकवून ठेवणारे विलासकाका हे धुरंधर व आक्रमक काँग्रेसचे राजकारणी होते. स्वातंत्र्य चळवळ हा पक्षाचा त्यागाचा व विचार आहे याचे सर्वात जास्त महत्व जाणणारे व आदर बाळगणारे ते नेते होते. त्यांना घरातून स्वातंत्र्य चळवळीचा वारसा मिळाला होता. स्वातंत्र्य चळवळीतून धर्म निरपेक्षता पुढे देणगी मिळाली आहे ती जनतेने भेद मिटवून जपली पाहिजे आचरणात आणली पाहिजे जाती व पंथ भेद टाकून दिले पाहिजेत असे प्रभावी विचार पद्धतीने ते भाषणातून सतत सांगणारे व याविचारावर खूप ज्ञान निष्ठा असलेले  नेते होते. प्रागतिक विचार आसक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वात वेगळे पण होते ते त्यांनी कायम जपले होते.

माध्यम प्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक विचार भेद असले तरी काकांच्या ज्ञान निष्ठेचे मोल खूप वाटत राहतं असे. त्या एका या गुणामुळे त्यांच्या फटकळ व पानउतारा करण्याच्या दोषबद्दल लोक सारे विसरून जात. काका हे वरून काटेरी व आतून मदत व सहकार्यवादी होते. ते अनेकांना अप्रत्यक्ष मदत करीत होते. उघड शत्रुत्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते अश्या वेळी त्यांनी तसे असंख्य कार्यकर्ते घडविलेही व जवळही केले होते. त्यांना उभे ही केले होते आणि आहे.

जे चांगले व नवे ज्ञान व विचार येतात ते स्विकारले पाहिजेत. ते पोहचले पाहिजेत असे वाटणारे विलास (काका) उंडाळकर प्रबोधन व कुरघोडीचे राजकारण यात अखेर पर्यंत व्यस्तही होते आणि त्यात मानसिक पातळीवर त्यांची द्विधा आढळून येत असे. स्वातंत्र्य चळवळ विचार प्रत्येक पिढीला समजली पाहिजे. तो ऐक विचार आहे तो जनतेत घेवून जाणारे नेते म्हणून काका सातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनात  व स्मृतीत कायम राहतील.
                                 
विलास काका हे एक प्रगत विचाराचे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा संस्काराचे व विचाराचे नेते म्हणून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल सातारा जिल्ह्यातील अनेक नेते व जनता त्यांना सडेतोड भूमिका व स्पष्टवक्ता नेता ज्ञान व नव विचार यांचे सतत आस्था असणारे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून त्याचे योगदान स्मृतीच्या पातळीवर जपत राहील. विलास काका उंडाळकर यांचे अस्वस्थ प्रबोधन करू पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्या आडगेले पण त्यांच्या संस्था व कार्यकर्ते निर्माण हे टिकून राहील या राजकीय व सामाजिक योगदानासाठी त्यांच्या जाण्याने अधिक दुबळ्या झालेल्या धर्म निरपेक्ष जाती विहीन विचारासाठी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सर्वस्वी सहभागी होवून विनम्र अभिवादनच करीत आहोत व काका या व्यक्तीच्या विचार प्रतीची ही तीव्र सह वेदना आंतरिक जपत आहोत असे राऊत यांनी नमूद केले. 

सावित्रीबाईंची जयंती देशभर महिला शिक्षण दिन साजरा हाेण्यासाठी केंद्रास मागणी : छगन भुजबळ  

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील उंडाळकर यांना श्रध्दांजली वाहिली. ते म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे लोकाभिमुख नेतृत्व आज हरपले आहे.

काकांनी उदयनराजेंना राजकारणातील हिरो बनविले

माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार क्षेत्रासह सर्वच क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असले तरी राजकारणात व सामाजिक जीवनात सातारा जिल्ह्यात असे नेतृत्व पुन्हा होणार नाही, अशी भावना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. 

उंडाळकर घराण्याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. तहयात सर्वच उंडाळकर बंधूंनी ती जपण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हा बँकेसह सर्वच मोठ्या संस्था आज ज्या प्रगती पथावर आहेत, त्या इथपर्यंत आणण्याचे काम विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात झाले आहे.

आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असले तरी राजकारणात जिल्ह्यात असे नेतृत्व पुन्हा होणार नाही, ही खंत मंत्री देसाई यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शासनाच्या वतीने विलासराव पाटील उंडाळकरांना त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी उंडाळकर काका यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या सर्व क्षेत्रात त्यांनी चांगले काम करुन महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com