शिवेंद्रसिंहराजेंचा "डाव' राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?

उमेश बांबरे
Tuesday, 26 January 2021

जिल्हा बॅंक आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रसिंहराजेंच्या भोवतीने राजकारण फिरू लागले आहे.

सातारा : नवीन वर्षात होणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आतापासूनच गरम झाले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी जाणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मदतीने सातारा पालिकेची निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न शिवेंद्रसिंहराजेंकडून होऊ शकतो. त्याला अजित पवारांचा हिरवा कंदील व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची त्यांना साथ मिळणार का, यावर या दोन्ही निवडणुकांची गणिते अवलंबून आहेत.
 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बालेकिल्ला राखला असला तरी या बालेकिल्ल्यात भाजपसोबतच आता शिवसेनेनेही मुसंडी मारली आहे. कॉंग्रेस पुन्हा एकदा बॅकफुटवर गेली आहे. नवीन वर्षात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या सर्व पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यासोबतच पालिकांच्या निवडणुकाही चुरशीच्या होतील. त्यासाठी आतापासूनच वातावरण तापायला सुरवात झाली आहे. सातारा पालिकेच्या निवडणुकीत आजपर्यंत सातारकरांना तिसरा सक्षम पर्याय मिळालेला नव्हता. पण, शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्यानंतर आता राष्ट्रवादीने सातारा पालिकेत स्वतंत्र पॅनेल टाकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आमदार शशिकांत शिंदे हे सातारकरांसाठी तिसरा पर्याय देणार आहेत.

Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ

खासदार उदयनराजे भोसले हे सातारा विकास आघाडीचे स्वतंत्र्य पॅनेल भाजपच्या मदतीने टाकणार हे निश्‍चित आहे, तर शिवेंद्रसिंहराजेंना पॅनेल टाकताना भाजपच्या काही समर्थकांचा पाठिंबा मिळेल. पण, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला मानणारे नगरसेवकही आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीकडून स्वतंत्र पॅनेल होणार असेल तर शिवेंद्रसिंहराजेंना पॅनेल करताना अडचण होऊ शकते. त्यासाठी राष्ट्रवादीसोबतच जुळवून घेऊन पॅनेलमध्ये सहभागी होणे शिवेंद्रसिंहराजेंना सोपे जाऊ शकेल. त्यासाठी त्यांनी आतापासूनच "डाव' टाकण्यास सुरवात केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक त्यांना फायद्याची ठरू शकते.

जिल्हा बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंची मोठी ताकद 

जिल्हा बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंची मोठी ताकद आहे. त्यांच्या विचाराचे पाच संचालक बॅंकेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या मदतीने राष्ट्रवादी हे पाच हक्काचे संचालक मिळवून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करू शकते. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक लढण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांत एकमत झालेले आहे. जिल्हा बॅंक आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रसिंहराजेंच्या भोवतीने राजकारण फिरू लागले आहे. त्यांची मदत घेऊन राष्ट्रवादी दोन्ही निवडणुका सोप्या करण्यासाठी राजकीय व्ह्यूवरचना आखत आहेत. त्याला उपमुख्यमंत्री संमती देणार का, यावर या दोन्ही निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.
 
एकूणच, सध्याच्या राजकीय हालचालींतच शिवेंद्रसिंहराजे भोसले हे केंद्रबिंदू ठरलेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा पालिकेच्या निवडणुकीत पॅनेल टाकण्याचे जाहीर करून सातारकरांपुढे तिसरा पर्याय उभा केला आहे. पण, खरी अडचण जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत असल्याने शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला ही निवडणूक सहज शक्‍य नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील ताकदीच्या जोरावर सातारा पालिकेची निवडणूक राष्ट्रवादीच्या मदतीने सोपी करण्याचा प्रयत्न शिवेंद्रसिंहराजेंकडून होऊ शकतो. त्याला अजित पवारांचा हिरवा कंदील व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची त्यांना साथ मिळणार का, यावर या दोन्ही निवडणुकांची गणिते अवलंबून आहेत. 

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

उदयनराजे, आमदार गोरेंवर मदार 

जिल्हा बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंसोबतच भाजपचे आमदार जयकुमार गोरे व खासदार उदयनराजे भोसले हे संचालक आहेत. भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात जिल्हा बॅंकेत पॅनेल टाकण्याची तयारी ठेवली आहे. पण, त्यामध्ये यश येण्यासाठी हे तीन प्रमुख संचालक एकत्र असणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीने शिवेंद्रसिंहराजेंना हाताशी धरल्यास आमदार गोरे, उदयनराजेंच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेत भाजपला पॅनेल उभे करावे लागेल. भाजपची ताकद विभागली गेल्यास या निवडणुकीत त्यांना यश मिळवण्यासाठी झगडावे लागेल.

अभिनेते सयाजी शिंदे साताऱ्यात साकारणार पर्यावरणीय उद्यान

शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Shivendrasinghraje Bhosale Udayanraje Bhosale Jaykumar Gore Satara Marathi News