esakal | Satara : ‘किसन वीर’च्या सभेत बोलू न दिल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Satara : ‘किसन वीर’च्या सभेत बोलू न दिल्याचा आरोप

Satara : ‘किसन वीर’च्या सभेत बोलू न दिल्याचा आरोप

sakal_logo
By
अक्षय साबळे

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची आज झालेली वार्षिक सभा ही केवळ औपचारिकता आणि फार्स होता. या सभेत आम्हाला जाणीवपूर्वक बोलू न देऊन आम्हा सभासदांच्या हक्कांची पायमल्ली केली आहे. व्यवस्थापनाच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे या सभेस उपस्थित असलेले सभासद बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे आदींनी म्हटले आहे.

या संदर्भात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की सभेत सहभागी होण्यासाठी निर्धारित वेळेत आम्ही नोंदणी केली होती. प्रत्यक्ष सभा सुरू होण्यापूर्वी आम्ही ऑनलाइन हजरही होतो. प्रत्यक्ष लेखी प्रश्नांचा आढावा घेताना अध्यक्षांनी इतरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; परंतु जेव्हा आमचे प्रश्न आले तेव्हा त्यांनी केवळ एक जणाचा (बाबासाहेब कदम) उल्लेख केला. ते हजर असूनही आणि कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही अध्यक्षांनी आमचा प्रश्नही वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत. कारखान्यापुढे असलेल्या आव्हानांबाबत बोलून पुढे आपण कशी वाटचाल करणार आहोत, याचे दिशादिग्दर्शन करणे अपेक्षित होते; परंतु यातील काहीच घडले नाही.

दरम्यान, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व ताळेबंदासोबत जोडलेली परिशिष्ठ्ये याबाबत आमचे अत्यंत गंभीर आरोप होते. विशेषतः ताळेबंदात शेतकऱ्यांच्या ठेवीचे व्याज देण्यासाठी तरतूद केलेली नाही. कामगारांच्या बोनस रकमेची तरतूद नाही. ठेवींमध्ये दिसत असलेली अनाहूत रक्कम कोणी ठेवली? ताळेबंदातून प्रतापगड युनिटचे आर्थिक तपशील उडवून प्रतापगड साखर उद्योगाचा वेगळा ताळेबंद तयार केला असला तरी त्या ताळेबंदातील कर्जाची व देणे रकमांची जबाबदारी नेमकी कोणाची? ‘किसन वीर’च्या सभासदांवर तो कर्जाचा बोजा पडणार का? एफआरपीप्रमाणेही ऊसबिले केव्हा मिळणार आदी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित होती; परंतु व्यवस्थापनाने आमचा आवाज बंद केला, असेही या पत्रकात म्हटले आहे.

loading image
go to top