
नवीन अॅक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल पासिंग करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील आरटीओ कार्यालयातील एका खासगी एजंटावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.
कऱ्हाड (जि. सातारा) : नवीन अॅक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल पासिंग करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील आरटीओ कार्यालयातील एका खासगी एजंटावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. राजू जाधव असे संबंधित खासगी एजंटाचे नाव असल्याची माहिती सांगलीच्या लालुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. कऱ्हाड आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने खासगी एजंट हादरले आहेत.
उपाधीक्षक श्री. घाटगे म्हणाले, एका तक्रारदाराने नवीन अॅक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल घेतली होती. ती पासिंग करण्यासाठी कऱ्हाड-विजयनगर येथील खासगी एजंटाने संबंधित तक्रारदारास पाच हजारांची लाच मागितली. त्याची माहिती तक्रारदाराने आम्हाला दिली. त्यानुसार आम्ही सापळा लावला. त्यामध्ये खासगी एजंट जाधव याच्यावर आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. संबंधिताने तक्रारदारांकडे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी पाच हजाराची लाच मागणी केली होती. संबंधित कारवाई सांगली विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, हवालदार संजय संकपाळ, संजय कलकुटगी, धनंजय खाडे, राधिका माने, बाळासाहेब पवार यांनी केली. दरम्यान, कऱ्हाडच्या आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाने अशी कारवाई केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कऱ्हाड जनता बॅंकेच्या चार कर्जदारांमुळे दोन लाख ठेवीदार वेठीस
संपादन : बाळकृष्ण मधाळे