दरे बुद्रुकची अस्तित्वासाठी लढाई; ग्रामपंचायत टिकवण्याचे आव्हान!

गिरीश चव्हाण
Sunday, 18 October 2020

दरे खुर्द आणि दरे बुद्रुक या दोन भूभागावर असणाऱ्या लोकवस्तीच्या आधारे ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुक कार्यरत होती. कार्यकारिणीची मुदत संपली आणि त्याठिकाणी प्रशासकाची नियुक्‍ती झाली. त्यानंतरच्या हद्दवाढीत दरे खुर्द पालिकेत सहभागी झाले. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार दरे खुर्दची लोकसंख्या तीन हजार 900 च्या आसपास होती. या दरे खुर्दच्या अखत्यारित सध्या 215 हेक्‍टर 12 आर इतके निवासी, अनिवासी आणि शेतीक्षेत्र आहे.

सातारा : पालिकेच्या हद्दीत ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुकचा सगळ्यात मोठा भूभाग सहभागी झाला आहे. या भूभागाच्या समावेशामुळे दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग संपुष्टात आले आहेत. तीन प्रभाग संपुष्टात आले असले तरी उर्वरित एक प्रभाग, दोन सदस्य आणि त्याठिकाणच्या लोकसंख्येच्या जोरावर दरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अस्तित्वाची लढाई सुरू होत आहे. यासाठी ग्रामस्थांनी योग्य त्याठिकाणी दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. 

दरे खुर्द आणि दरे बुद्रुक या दोन भूभागावर असणाऱ्या लोकवस्तीच्या आधारे ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुक कार्यरत होती. कार्यकारिणीची मुदत संपली आणि त्याठिकाणी प्रशासकाची नियुक्‍ती झाली. त्यानंतरच्या हद्दवाढीत दरे खुर्द पालिकेत सहभागी झाले. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार दरे खुर्दची लोकसंख्या तीन हजार 900 च्या आसपास होती. या दरे खुर्दच्या अखत्यारित सध्या 215 हेक्‍टर 12 आर इतके निवासी, अनिवासी आणि शेतीक्षेत्र आहे. दरे बुद्रुकपेक्षा जास्त लोकसंख्या दरे खुर्दची असल्याने रोटेशननुसार सदस्यसंख्या असणारा प्रभाग याठिकाणी निवडणुकीवेळी जाहीर होत असे. दरे बुद्रुकमध्ये असणाऱ्या एका प्रभागात यानुसार कधी तीन तरी कधी दोन सदस्य निवडून येत. यानुसार सध्याच्या जानाईदेवी प्रभागात दोन सदस्य आहेत. यामध्ये आमदार गटाच्या स्वाती विश्‍वास मोरे आणि खासदार गटाच्या सुजित कोकरे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक असला तरी जानाईदेवी प्रभागामुळे दरे बुद्रुकचे राजकीय अस्तित्व टिकून आहे. दरे बुद्रुकच्या अखत्यारित निवासी, अनिवासी तसेच कृषी असे मिळून सुमारे 414 हेक्‍टर 43 आर इतके क्षेत्र आहे. 

दरे बुद्रुकची अवस्था ना घर का, ना घाट का!

दरे नावाची अनेक गावे असल्याने उच्चारताना दरे बुद्रुकचा नामोल्लेख पूर्वापार अंबेदरे असा होत आला आहे. यामध्ये भोसलेवाडी, आनंदवाडी, धनवडेवाडी, जाधववाडी, मोरेवाडी, आवाडवाडी, निकमवाडी तसेच परिसरातील काही कॉलन्यांचा सहभाग आहे. ग्रामपंचायतीचे मुख्यालय दरे बुद्रुक येथे आहे. सातारा शहराशी सलगता असल्याने दरे खुर्दचा ज्या झपाट्याने विकास झाला, त्या प्रमाणात दरे बुद्रुक काहीअंशी मागासलेच राहिले. लोकसंख्येच्या निकषावर याठिकाणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत सदस्यसंख्येनुसार दरे खुर्दवरच अवलंबून असला तरी सत्तेच्या समीकरणात दरे बुद्रुकचा अनेकवेळा ग्रामपंचायतीच्या राजकारणावर वरचष्मा राहिला आहे. पालिका हद्दीत सहभागी झालेल्या भागाचे दप्तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामादरम्यान दरे बुद्रुकचे दप्तर या प्रशासनाला ग्रामपंचायतीकडेच ताब्यात ठेवावे लागणार आहे. एक प्रभाग आणि दोन सदस्यांच्या रूपाने दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे अस्तित्व कागदोपत्री जिवंत असून, वाढीव लोकसंख्येचा निकष लावत याठिकाणी मूळ ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे. यासाठी आवश्‍यक त्याठिकाणी पत्रव्यवहार, गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या आहेत. (क्रमश:) 

जो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'!

सात सदस्यांची होवू शकते ग्रामपंचायत 

दरेखुर्द पालिका हद्दीत सहभागी झाला तर दरेबुद्रुकचा एक प्रभाग ग्रामपंचायतीला चिटकून आहे. 2011 च्या जनगणनेनुसार दरे बुद्रुकची लोकसंख्या दोन हजार 859 इतकी होती. 2020 पर्यंत त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. या वाढीव लोकसंख्येची मोजणी करत दरेबुद्रुक ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन होणे प्रशासकीय पातळीवर सहज शक्‍य आहे. हे शक्‍य झाल्यास याठिकाणी पुन्हा सात सदस्य संख्या असणारी ग्रामपंचायत कार्यरत होवू शकते.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal To Maintain Gram Panchayat In Front Of Dare Budruk Village Satara News