..तसे न झाल्यास तमाशा फडमालक आक्रमक भूमिका घेतील!

हेमंत पवार
Wednesday, 9 September 2020

राज्यातील छोटे-मोठे तमाशा फड खासगी सावकारांचे कर्ज घेतात. कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हास भेट देत नाहीत. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी संगीत बारीच्या कलवंतांची दखल घेतली; परंतु आम्ही वेळोवेळी भेटण्याचा व फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : तमाशा फडमालकांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लक्ष द्यायला वेळ नाही. कोरोनामुळे हंगाम न झाल्याने तमाशा फडमालकांच्या मागण्यांचा शासनाने विचार करून 20 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा. तसे न झाल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 25 सप्टेंबरपासून येथील प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ राज्यातील तमाशा फडमालक येऊन तमाशाचा कार्यक्रम करतील, असा इशारा अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. 

तमाशा फडमालकांची तातडीची बैठक श्रीमती मंगला बनसोडे-करवडीकर, परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, अध्यक्ष आविष्कार मुळे, सचिव मोहित नारायणगावकर, तानाजीराव वाघेरीकर, मुबारक बोरगावकर, सुनील वाडेकर यांच्यासह फडमालकाच्या उपस्थितीत नुकतीच झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हास भेट देत नाहीत. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी संगीत बारीच्या कलवंतांची दखल घेतली; परंतु आम्ही वेळोवेळी भेटण्याचा व फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. 

इंग्रजांना सळो की, पळो करून सोडणारी वडूजची क्रांती! आजच्या दिवशी घडला होता इतिहास!

राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. राज्यातील छोटे-मोठे तमाशा फड खासगी सावकारांचे कर्ज घेतात. कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे खासगी सावकारांनी देणे देण्यासाठी तगादा लावू नये, लोककला अनुदान पॅकेज कायमस्वरुपी 2008 च्या धरतीवर सुरू करावे, महामंडळ किंवा बॅंकेतून 50 लाख रुपये तंबूच्या फडासाठी, 20 लाख रुपये आठ महिने कार्यक्रम करणाऱ्या फडासाठी, पाच लाख रुपये एक महिना कार्यक्रम करणाऱ्या फडासाठी कर्ज रूपात मिळावे, तमाशा लोककलावंत यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे आदी मागण्या आहेत. 

उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा!

तमाशाफड मालक, कलावंतांच्या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याबाबत बैठकीचे आयोजन 20 सप्टेंबर करावे. तसे न झाल्यास तमाशा परिषदेच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ महाराष्ट्रातील तमाशा कलावंत व फड मालक 25 सप्टेंबरपासून आंदोलन उभे करतील. त्यासाठी स्टेज लावून तमाशाचा कार्यक्रम सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत न थांबता सादर केले जातील, असाही इशारा परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artists' Agitation In Karad From September 25 Satara News