esakal | पीक नुकसानीची भरपाई द्या; 'बळीराजा'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

पीक नुकसानीची भरपाई द्या; 'बळीराजा'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारतर्फे मदत जाहीर करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली आहे.

कोरोना काळात प्रशासन महामारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, कोरोनाचे संकट काही दूर होताना दिसत नाही. आज सर्वसामान्य जनता, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कधी निसर्गनिर्मित संकटे, तर कधी मानवनिर्मित संकटे यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगड, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरेगाव, पाटणात अवकाळीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; 323 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

त्यातच कोरोनामुळे शेतीमालाला, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना, फळांना मागणी नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जे विकतेय तेही पावसात वाया जात आहे. त्यामुळे निसर्गनिर्मित संकटामुळे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. रात्रं-दिवस शेतामध्ये काबाडकष्ट करून शेतकरी जमिनीत सोनं पिकवतो. मात्र, अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या अस्मानी संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे, पडलेल्या घरांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale