esakal | कोरेगाव, पाटणात अवकाळीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; 323 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

crop

कोरेगाव, पाटणात अवकाळीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; 323 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाशी मुकाबला करताना शेतकऱ्यांना या वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचाही सामना करावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात झालेल्या गारपिटीमुळे कोरेगाव, खटाव, पाटण व माण तालुक्‍यांतील 323.36 हेक्‍टर क्षेत्रावरील बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एक हजार 29 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक नुकसान खटाव तालुक्‍यात झाले आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून सुरू असून, या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील जनता सध्या कोरोनाशी मुकाबला करत आहे. शेती व्यवसाय वगळता उर्वरित सर्व व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद आहेत. अशातच शेतीचा सर्वांना आधार ठरला आहे; पण कोरोनाशी दोन हात करताना मागील दोन, चार दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. याचा सर्वाधिक फटका कोरेगाव, खटाव, माण व पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. या तालुक्‍यातील टोमॅटो, वांगी, कांदा, भाजीपाला, मका, झेंडू, पपई, घेवडा, हरभरा, बाजरी, मिरची, भोपळा तसेच आंबा, चिकू, कलिंगड या फळपिकांचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात झालेल्या गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्‍यात काही ठिकाणी रस्त्यांवर व शेतात गारांचा खच पडला होता. त्यामुळे गारपिटीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड, चिकू या फळांची गळ होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये आर्थिक आधार ठरलेल्या बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

लॉकडाउनमुळे झेंडू कोमेजला, कोरोनाने बळीराजा हिरमुसला!

कोरेगाव तालुक्‍यातील 87 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असून, 291 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्‍यातील 237 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन 729 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचे 0.26 हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. माण तालुक्‍यातील 2.10 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान होऊन आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कृषी विभाग व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, या नुकसानीत आणखी भर पडणार आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थितीत भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Edited By : Balkrishna Madhale