केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट

हेमंत पवार
Tuesday, 15 September 2020

कांद्यावर निर्यातबंदी लावल्यामुळे एक हजार रुपयांनी कांद्याचे दर ढासळले आहेत. आणखी दर खाली येणार आहेत. केंद्र सरकारच्या या जुलमी व तुघलकी निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी संतापाची लाट उसळली आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. पदाधिकऱ्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना आज निवेदन दिले. 

कोरोनाच्या कालावधीत सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे सुरू आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी निसर्गनिर्मित तर कधी मानवनिर्मित संकटांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी तत्काळ उठवावी. त्यामुळे शेतकरी आपल्या परीने कांद्याची विक्री करेल. एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट घेण्याचे आवाहन करतंय. परंतु, त्याला हमीभाव भेटत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. 

कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक!

कांद्यावर निर्यातबंदी लावल्यामुळे एक हजार रुपयांनी कांद्याचे दर ढासळले आहेत. आणखी दर खाली येणार आहेत. केंद्र सरकारच्या या जुलमी व तुघलकी निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी उठवावी. अन्यथा केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 

रयत बॅंकेच्या निवडी बिनविरोध; अध्यक्षपदी पोपटराव पवार, उपाध्यक्षपदी लालासाहेब खलाटे

त्यामुळे बळिराजा शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनाव्दारे बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख साजिद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, युवा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, कऱ्हाड उत्तर युवा अध्यक्ष रघुनाथ माने, प्रकाशराव पाटील, पोपट जाधव व शेतकऱ्यांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baliraja Farmers Association Is Aggressive Satara News