esakal | उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था मतदारसंघाकडे पाहिले जाते.

उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Co-operative Bank Election) गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था आदी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) हे या वेळेसही इच्छुक आहेत; पण त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत कोणीही इच्छुक दिसत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (Nationalist Congress Party) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Speaker Ramraje Naik- Nimbalkar) व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) हे दुसरा उमेदवार देणार का, याची उत्सुकता आहे. सध्या तरी उदयनराजेंना या मतदारसंघातून बिनविरोध निवडीची संधी दिसत आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून सर्वाधिक काळ अशोक पाटील- शिरगावकर यांनी प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघातून एकूण २७२ ठराव असून, सर्वाधिक ठराव सातारा व कऱ्हाड तालुक्यांतून आहेत. या मतदारसंघाचे दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये रघुनाथराव पाटील, शंकरराव संसुद्दी, हणमंतराव साळुंखे, जयवंतराव चव्हाण, अशोकराव पाटील- शिरगावकर यांचा समावेश आहे. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात खासदार उदयनराजे भोसले हे या मतदारसंघातून निवडून आले. मागील निवडणुकीत खासदार उदयनराजेंच्या विरोधात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये पालकमंत्री पाटील हे आमदार होते, त्यांचा उदयनराजेंनी पराभव केला होता. त्यानंतर तब्बल दोन पंचवार्षिक निवडणुकीत उदयनराजे भोसलेच संचालक झाले आहेत.

हेही वाचा: आगामी निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतः लक्ष घालणार

सध्याच्या संचालकांना कोरोनामुळे तब्बल १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी मुदतवाढ मिळालेली आहे. आता यावेळेस उदयनराजे हे याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांच्या नावाचा ठरावही करण्यात आलेला आहे; पण या वेळेची निवडणूक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मागील पराभवाची सल पालकमंत्री पाटील यांच्या मनात असल्याने ते उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने यावेळेस सर्वसमावेशक निवडणूक करण्याची भूमिका घेतली आहे; पण उदयनराजेंना सहजासहजी ही निवडणूक राष्ट्रवादीचे नेते सोपी ठेवणार नाहीत. रामराजे नाईक- निंबाळकर यांनी मागील पंचवार्षिकच्या वेळी उदयनराजेंच्या विरोधात ‘महानंदा’चे संचालक व फलटणचे नेते डी. के. पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे हा पायंडा लक्षात घेता यावेळेस रामराजेंच्या मनातील उमेदवार कोण याचीच उत्सुकता आहे.

हेही वाचा: सहकारातील 1317 संस्थांच्या निवडणुकांचा वाजला बिगुल

या मतदारसंघातील आजपर्यंतचे संचालक

माधवराव जाधव, जगन्नाथ पाटील, रघुनाथराव पाटील, शंकरराव संसुद्दी, हणमंतराव साळुंखे, जयवंतराव चव्हाण, अशोकराव शिरगावकर पाटील, उदयनराजे भोसले.

loading image
go to top