कांद्याने गाठली शंभरी; खर्चाचे गणित बिघडले

उमेश बांबरे
Friday, 23 October 2020

कमी दाबाच्या पट्ट्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे इतर पिकांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले. तसेच कोरोनाच्या काळात बाजार बंद होते. त्यात कधीही झोडपणारा पाऊस, भाजी विकायची कोठे, अशा समस्यांनी पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड करताना शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. साहजिकच आता शहरातील मंडईसह ग्रामीण भागात भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

सातारा : कमी दाबाच्या पट्ट्याने सातत्याने पडणारा पाऊस, भाज्यांची रोडावलेली आवक यामुळे भाज्यांचे दर कमालीचे वाढले असताना आता कांद्याने 100 गाठली असून, कोरोनाच्या संकटात मेटाकुटीला आलेल्या सामान्य नागरिकांचे खर्चाचे गणित बिघडून गेले आहे. 

मंडईत वांगी 80 ते 100 रुपये, गवार, पावटा, शेवगा, वाटाणा 100 ते 120 रुपये किलोने घ्यावा लागत असून, आठवड्यापूर्वी 25 ते 40 रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्यासाठी थेट 100 रुपये मोजावे लागत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणूचे सावट, अतिवृष्टी अशा संकटांचा सामना यावर्षी सर्व नागरिकांना करावा लागला. त्यातच मार्चपासूनचा काही कालावधी वगळता नागरिकांना किराण्यासह भाज्यांच्या महागाईसही तोंड द्यावे लागले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे इतर पिकांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले. तसेच कोरोनाच्या काळात बाजार बंद होते. त्यात कधीही झोडपणारा पाऊस, भाजी विकायची कोठे, अशा समस्यांनी पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड करताना शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. साहजिकच आता शहरातील मंडईसह ग्रामीण भागात भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

माण बाजार समितीचा कारभारी कोण?

80 रुपये किलोच्या आत कोणतीच फळभाजी मिळेनाशी झाली आहे. तसेच पालेभाज्यांच्या पेंडीचा आकार कमी झालेला असून, दर मात्र दुपटीने वाढले आहेत. दरम्यान, पावसाने कांद्याचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत कांद्याचे दर प्रतिप्रमाणे 100 ते 80 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. बाजारात वाळका बऱ्यापैकी प्रतीचा कांदा महाग असला तरी कोवळा ओला कांदा 60 ते 70 रुपये किलोने विक्रेते ग्राहकांच्या पदरात निवडून न देता सरसकट टाकत आहेत. त्यातील काही कांदे नासून जात आहेत. रोजच्या भोजनात कांदा अपरिहार्य असल्याने नागरिक महाग कांदा नाईलाजाने घेत आहेत. 

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा
 
भाज्यांचे दर (प्रतिकिलो) 
-टोमॅटो- 60 ते 80 
-गवार 100 ते 120 
-वांगी 80 
-शेवगा, पावटा 120 
-दोडका 80 
-मेथीची पेंडी 20 ते 25 
-पालक 10 ते 15 
-तांदळी 15 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Increase In Onion Prices Satara News