esakal | कऱ्हाड : चिंतन बैठकीस प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती; संघटन पातळीवर भाजपचे बदलाचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाड : चिंतन बैठकीस प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती; संघटन पातळीवर भाजपचे बदलाचे संकेत

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांची या बैठकीला अनुपस्थिती होते. त्याबाबत जिल्हाध्यक्ष पावसकर म्हणाले,""खासदार निंबाळकर दिल्लीत आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्यांनी तसे कळवले आहे. त्यांचे प्रतिनिधी येथे आले आहेत.''

कऱ्हाड : चिंतन बैठकीस प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती; संघटन पातळीवर भाजपचे बदलाचे संकेत

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या बैठकीला पक्षीय पातळीवर मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळे संघटन पातळीवर काही बदलाचे संकेतही मिळत आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पुणे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख येथे त्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.
 
भाजपच्या बैठकीला त्यांनी ग्रामपंचायत, महापालिका, पालिकांच्या निवडणुकांचीही जोड दिली आहे. त्यासाठी व्यक्तिगत व ग्रुप पातळीवर सरचिटणीस आमदार चव्हाण संपर्क साधत आहेत. संघटनमंत्री देशपांडे यांनी बैठकांचे नियोजन केले. मध्यवर्ती ठिकाण म्हणून कऱ्हाडची निवड झाली असली, तरी पक्षीय पातळीवर होणाऱ्या चिंतन बैठकीला प्रदेशाध्यक्ष पाटील यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते. पाचही जिल्ह्यांतील प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे समर्थक फारसे कोणी बैठकीकडे फिरकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी प्रदेश सरचिटणीसांना अर्ज पाठवून त्यांचे लेखी म्हणणे दिले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून भाजपचे पदाधिकारी भेटले आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांचे समर्थक नव्हते. मात्र, जे पदाधिकारी भेटले आहेत. त्यांनी सरचिटणीस आमदार चव्हाण यांना काही फिडबॅक दिला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते अतुल भोसले, प्रवक्‍ते भरत पाटील यांच्यासह काही पदाधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातून धनंजय महाडिक, माजी आमदार अंमल महाडिक, जिल्हाध्यक्ष सत्यजित घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शिराळा तालुक्‍यातून पापा नाईक, सोलापूर जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील, सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख, त्यांचे काही पदाधिकारी अशा चारही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची येथे चर्चा झाली. जिल्ह्यातून नोंदणी झालेले मतदान आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यातील फरक कोणत्या कारणाने आहे, याची विचारणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्यादृष्टीने यापुढची पक्षाची बांधणी असणार आहे, असे संदेशही नेते, कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या व्यापक बांधणीसाठी सोनिया गांधी सकारात्मक : पृथ्वीराज चव्हाण

आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, ""पुणे पदवीधर निवडणुकीत का पराभव झाला याचा अभ्यास आम्ही करत आहोत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर भाजपने नोंदवलेली मते घेतली गेलीच नाहीत. ती मतदार यादीत आलीच नाहीत. त्यामुळे पराभव झाला हे नक्की. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दोन वेळा विजय झाला. त्या वेळी विरोधी उमेदवारांची मत विभागणी महत्त्वाची ठरली होती. ती आता एकत्र आली. त्यामुळे ते विजयी झाले. पराभवाची कारणे शोधून संघटन पातळीवर काय बदल करता येतील, याचा शोध घेण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यादृष्टीने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. त्यादृष्टीने विचारही होईल. त्यासोबतच ग्रामपंचायत, पालिका, महापालिकांच्या निवडणुकांची स्थिती जाणून घेण्याचेही काम करत आहे.'' 

शिरवळकरांचा भाजपच्या सरपंचांवर विश्वास; राष्ट्रवादीसह विरोधी गटाची 714 मतांनी धोबीपछाड

साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांची या बैठकीला अनुपस्थिती होते. त्याबाबत जिल्हाध्यक्ष पावसकर म्हणाले,""खासदार निंबाळकर दिल्लीत आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्यांनी तसे कळवले आहे. त्यांचे प्रतिनिधी येथे आले आहेत.''

Edited By : Siddharth Latkar