स्वराज्य संस्थांसह गावपातळीवरील निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

संतोष चव्हाण
Friday, 20 November 2020

पालकमंत्र्यांनी कोरोना महामारीमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला गरज नव्हती तेव्हा कोविड सेंटरची उभारणी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण यामध्ये हे सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला आहे.

उंब्रज (जि. सातारा) : कोरोना काळात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कऱ्हाड उत्तरेतील स्थानिक स्वराज्य संस्थांसह गावपातळीवरील निवडणुका भाजप यापुढे स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, "पालकमंत्र्यांनी कोरोना महामारीमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला गरज नव्हती तेव्हा कोविड सेंटरची उभारणी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण यामध्ये हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. अतिवृष्टी, प्रवासी, मजूर, निसर्ग चक्रीवादळ, कोरोनाबाधित छोटे- मोठे व्यापारी, व्यावसायिक, पालघर हत्याकांड, प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्यावर द्वेषभावनेने कारवाई या सर्व प्रकारामुळे राज्य सरकार बदनाम झाले आहे. 

थकीत बिलासाठी बांधकाम कंत्राटदारांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे

आगामी काळामध्ये सर्व निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने स्वबळावर लढवणार आहे. निवडणुकांना सामोरे जातानाच सर्व ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांवर काम करणार आहे.'' उंब्रजला 21 कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना आराखडा तयार झाला आहे. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी अद्याप बाकी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशांत देशमुख यांनी दिली. या वेळी तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, महेंद्रकुमार डुबल, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, रामकृष्ण वेताळ, ऍड. विशाल शेजवळ उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Will Contest Village Level Elections On Its Own Satara News