समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे 'मायक्रो प्लॅनिंग' : आमदार गोरे

विशाल गुंजवटे
Tuesday, 24 November 2020

पाचही जिल्ह्यांत पक्षाची विचारधारा मानणारा मतदार मोठ्या संख्येने भाजप उमेदवारांच्या पाठीशी आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

बिजवडी (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना माण तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल. समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांचा भाजपवरील विश्वास या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल, असे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिवडी येथील भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्ष धनाजी जाधव, धीरज दवे, सिध्दार्थ गुंडगे, बाळासाहेब मुगधे, राजाराम बोराटे, काका माने, विलास देशमुख, गोरख मदने, श्रीकृष्ण कट्टे, रवी तुपे, बबनराव काळे, पिंटू जाधव उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ""भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. आताही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपने दोन सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे. 

महाविकास आघाडीचे भंपक सरकार उलथवा : चंद्रकांत पाटील

पाचही जिल्ह्यांत पक्षाची विचारधारा मानणारा मतदार मोठ्या संख्येने भाजप उमेदवारांच्या पाठीशी आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेरोजगारांना नोकऱ्या किंवा किमान बेरोजगार भत्ता देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक तालुक्‍यात औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी भाजपने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही केले आहेत. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.'' पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने दिलेली जबाबदारी पार पाडावी. प्रत्येक गावातील प्रत्येक मतदारांपर्यंत आपली विचारधारा पोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. माण तालुक्‍यात भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्‍य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Workers Meet At Dahiwadi On The Backdrop Of Pune Elections Satara News