तासवडेतील गुटखाप्रकरणी साताऱ्यातील दोघांना पोलिस कोठडी

तानाजी पवार
Sunday, 22 November 2020

शुक्रवारी पहाटे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटकातून गुटखा विक्रीस येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासवडे टोलनाका परिसरात सापळा रचला होता.

वहागाव (जि. सातारा) : बंदी असतानाही पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्‍यानजीक असणाऱ्या एका हॉटेलसमोर सुमारे साडेतीन लाखांच्या गुटख्यासह कार असा मिळून एकूण सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, पोलिसांनी संबंधित संशयितांना कऱ्हाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

वैभव रवींद्र पावसकर (वय 31) व ओंकार अरुण देशपांडे (वय 30, दोघे रा. शनिवार पेठ, सातारा) अशी अटकेत असणाऱ्या संशयिताची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शुक्रवारी पहाटे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटकातून गुटखा विक्रीस येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासवडे टोलनाका परिसरात सापळा रचला होता.

तासवडे टोलनाक्यावर साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; साताऱ्यातील दोघांना अटक 

दरम्यान, ही कार (एमएच 12 जेसी 506) ही बेलवडे हवेली हद्दीतील एका हॉटेल समोर उभी असल्याचा संशय पोलिसांना आला. या दरम्यान पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता पोलिसांना कारमध्ये तीन लाख रुपयांचा गुटखा मिळून आला. या वेळी पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीच्या गुटख्यासह कार असा मिळून सुमारे सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलिसांत करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी काल कऱ्हाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड अधिक तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both Have Been Remanded In Police Custody In Connection With The Gutkha Case At Taswade Satara News