
सातारा : मटण खाऊ न दिल्याने मुलाने केला वडिलांचा निर्घृण खून
दहिवडी - कासारवाडी (ता. माण) येथे मटण का खायला घालत नाही, या कारणावरून मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करून वडिलांचा निर्घृण खून केला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. याबाबतची माहिती अशी, कासारवाडी गावच्या हद्दीत भंडारदरा मळवी नावाच्या शिवारात पांडुरंग बाबूराव सस्ते (वय ७०) हे आपल्या कुटुंबीयांसह शेतातील घरात राहतात. काल सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पांडुरंग सस्ते यांचा धाकटा मुलगा नटराज पांडुरंग सस्ते (वय २९) याने वडिलांना तुम्ही मला मटण का खायला घालत नाही, असे म्हणत भांडण करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आता त्याने वडिलांच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ संशयिताला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर शनिवार सकाळी पांडुरंग सस्ते यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चतुराबाई पांडुरंग सस्ते यांनी याबाबतची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक डी. डी. तुपे हे अधिक तपास करीत आहेत.