कुक्कुटपालन ठरले महिलांना फायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poultry farming provides employment to women

कुक्कुटपालन ठरले महिलांना फायदेशीर

बचत गटांच्या चळवळीत शेतकरी महिला प्राधान्याने सहभागी झाल्या आणि त्यांनी व्यवसायही प्रामुख्याने शेतीपूरकच निवडले. कुसवडे (ता. सातारा) या छोट्या गावातील महिलांनी कृषिकन्या, आदर्श शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत कुक्कुटपालन सुरू केले आहे. आता दररोज २०० ते २५० अंडी विक्री करून त्या कुटुंबाला हातभार लावत आहेत.

कुसवडेत शेती हा गावातील मुख्य व्यवसाय आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून लोक आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील बहुतांश महिला बचत गट चळवळीत सहभागी आहेत. हे पाहून वॉर्ड संस्थेने येथे महिला सक्षमीकरणाचे काम सुरू केले.

संस्थेने एकूण पाच गटांची निर्मिती केली. या गटांना नियमित प्रशिक्षणे, अभ्यास सहली, बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेला. शेतीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, हेच ओळखून संस्थेने महिला शेतकरी गट तयार करून त्या माध्यमातून महिलांना सेंद्रिय शेती, पीक उत्पन्न वाढ, कृषी यांत्रिकीकरण, शेतीपूरक व्यवसायाची जोड याबाबत माहिती देणे, पान १ वरून

प्रशिक्षण देणे व अभ्यास सहलींचे आयोजन करणे या बाबींवर विशेष भर दिला. ग्रामीण उपजीविका प्रकल्पांतर्गत गावात आदर्श महिला शेतकरी गट व कृषिकन्या महिला शेतकरी गटांची निर्मिती केली. या गटांची जोडणी कृषी विभागांतर्गत आत्मा विभागाला केली. या गटांना नियमित भेटी देऊन अल्पखर्चिक कृषिपूरक व्यवसायावर भर दिला. त्यातूनच कृषिकन्या आणि आदर्श गटांच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार गटातील आठ महिलांनी हा व्यवसाय करण्यामध्ये रस दाखवला.

कृषिकन्या गटातील आशा सूर्यकांत कदम, अरुणा भानुदास यादव, नीलम विलास महाडिक, अर्चना मोहन चव्हाण, तर आदर्श गटातील उषा विनायक सराटे,सुवर्णा बापू खराटे, जयश्री पांडुरंग गोडसे, चंद्रभागा बाळकृष्ण मोरे या महिला हा व्यवसाय करत आहेत. बोरगावमधील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने महिलांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर संस्थेने ग्रामीण उपजीविका प्रकल्पाच्या माध्यमातून गटांना प्रत्येकी २२ हजार ५०० रुपयांचे भांडवल दिले. त्यात सहभागी महिलांनी स्वहिस्सा भरून ‘कावेरी’ या सुधारित जातीच्या प्रत्येकी ३० कोंबड्या विकत घेत व्यवसाय सुरू केला. या कामात अॅड. नीलिमा कदम, सुनीता बनसोडे यांनी त्यांना मदत केली.

महिला कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना करू लागल्या. कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन व काळजीतून दररोज सरासरी २०० ते २५० अंडी मिळत आहेत. या अंड्यांतून महिलांना चांगले पैसे मिळत आहेत. या छोट्याशा उपक्रमातून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे..

कोंबड्या, बकऱ्या तर आम्ही नेहमीच पाळत होतो. त्यांची आधुनिक पद्धतीने जोपासना कशी करायची आणि त्यांचे संगोपन फायदेशीर कसे ठरेल, याचे ज्ञान आम्हाला अॅवॉर्ड संस्थेने बचत गटाच्या माध्यमातून मिळाले. ते अतिशय उपयुक्त ठरले आहे.

- आशा कदम, कृषिकन्या शेतकरी महिला बचत गट, कुसवडे (ता. सातारा)

- दिलीपकुमार चिंचकर

Web Title: Business Idea Poultry Farming Is Beneficial Women Empowerment Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..