esakal | निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लसोत्‍सवातून राजकीय 'डोस'; गल्‍लीबोळात पुढाऱ्यांचा 'प्रचार' I Corona Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipal Election

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण जनजीवन ठप्‍प झाले होते.

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लसोत्‍सवातून राजकीय 'डोस'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : पालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) नजरेसमोर ठेवत साताऱ्यातील गल्‍लीबोळात राजकीय लसोत्‍सव सुरू झाला आहे. लसीकरण शिबिरे आयोजित करत ताई माई आक्का अशी साद घालत साताऱ्यातील इच्‍छुकांनी मतदारांची निवडणूकपूर्व हंगामी समाजसेवा या माध्‍यमातून सुरू केली आहे. शहरातील गल्‍लीबोळात सुरू झालेल्‍या शिबिरांमुळे सर्वसामान्‍यांची कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccination campaign) मिळवण्‍यासाठी सुरू असणारी धावपळ थांबण्‍यास काही अंशी मदत झाली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण जनजीवन ठप्‍प झाले होते. तीन महिन्यांहून अधिक काळ सर्वच व्‍यवहार ठप्‍प झाल्‍याने सर्वसामान्‍यांना अतोनात हालअपेष्टांचा सामना करावा लागला होता. या काळात काही जणांनी जणांनी निरपेक्ष हेतूने सर्वसामान्‍यांना मदत पोचवली, तर काही जणांनी या काळात आपली प्रतिमा उजळवून घेण्‍यासाठीचे उपक्रम राबवले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्‍याने जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच सातारा पालिकेच्‍या निवडणुकीची प्रशासकीय हातघाई सुरू झाली आहे.

हेही वाचा: हृदयविकाराला खरंच तेल, तुप घातक आहे? जाणून घ्या 'सत्य' कारण

निवडणुकीची हातघाई सुरू झाल्‍याने साताऱ्यातील गल्‍लीबोळांतील इच्‍छुकांनी चर्चेच्‍या मुख्‍य प्रवाहात ‍येण्‍यास सुरुवात केली. या इच्‍छुकांच्‍या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रभाव कमी करण्‍यासाठी शासनपातळीवर सुरू केलेल्‍या लसीकरण शिबिराचा लाभ जनाधार मिळवण्‍यासाठी करण्‍यावर यापैकी अनेक इच्‍छुकांचा जोर आहे. गेल्‍या चार दिवसांपासून साताऱ्यात अनेक ठिकाणी अशी शिबिरे सुरू असून, त्‍यासाठी इच्‍छुक झटत आहेत. शिबिराची माहिती देण्‍यासाठी उभारण्‍यात आलेल्‍या फलकांवर आपल्‍या नेत्‍याचे छायाचित्र लावत त्‍याखाली स्‍वत:चे आणि कार्यकर्त्यांची छायाचित्रे इच्‍छुकांकडून प्रसिद्ध करण्‍यात येत आहेत. या छायाचित्रांवर संयोजक, आधारस्‍तंभ, अध्‍यक्ष, युवा नेतृत्‍व, आशास्‍थान अशी बिरुदे देखील झळकविण्‍यात येत आहेत.

शिबिराच्‍या ठिकाणी नागरिकांना आणण्‍यासाठी, तसेच त्‍याठिकाणाहून जाण्‍यासाठी काहीजणांनी रिक्षा सुविधादेखील उपलब्‍ध करून दिली आहे. शिबिरात येणाऱ्यांची आस्‍थेवाईक चौकशी करत त्‍याआधारे अनेकांनी आपला जनाधार वाढविण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. गल्‍लीबोळातील शिबिरांमुळे साताऱ्यातील सर्वसामान्‍यांची लशीसाठी होणारी धावपळ कमी होण्‍यास मदत झाली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सुरू झालेल्‍या हंगामी समाजसेवेमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापण्‍यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: पावसामुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा 'परीक्षा' घेणार

इच्‍छुकांस मतांची अँटीबॉडी मिळणार?

राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवत आयोजित केलेल्‍या या शिबिरांमध्‍ये लस घेणारे मतदार इच्‍छुकास मताची अँटीबॉडी देतात का, हे येत्‍या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार आहे.

loading image
go to top