'शरद पवार, अजित पवारांचा अवमान करायचा नाही'; रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik Nimbalkar

'शरद पवार, अजित पवार हे आम्हाला आदरणीय असून आम्हाला त्यांचा अवमान करायचा नाही; पण..'

रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

केळघर, सातारा : जावळी मतदारसंघात (Jawali constituency) आमदार शशिकांत शिंदेंविरोधात (MLA Shashikant Shinde) आव्हान निर्माण करणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्यासाठी काल दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खल सुरू होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Speaker Ramraje Naik Nimbalkar), आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil), शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendrasinghraje Bhosale यांनी रांजणे यांच्या घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वीकृत संचालक करण्याची ऑफरही त्यांना दिली. मात्र, ती त्यांनी धुडकावत उलट ऑफर दिली.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जावळी मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. शशिकांत शिंदेंना संचालक होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चर्चेचा खल सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोबाईलवरून मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क करून आमदार शिंदेंचा मार्ग मोकळा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर काल दिवसभर चक्रे फिरत होती. रांजणेंचे मन वळविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी प्रयत्न केले. दुपारनंतर रामराजे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे, अनिल देसाई हे रांजणेंची मनधरणी करण्यासाठी जावळीतील त्यांच्या घरी गेले. त्या वेळी वसंतराव मानकुमरेही तेथे उपस्थित होते. या सर्वांची बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्यामध्ये रांजणेंनी रिंगणातून मागे येत त्यांच्याकडील मते शशिकांत शिंदेंना द्यावीत, त्यांचा संचालक होण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा वरिष्ठांनी व्यक्त केली; पण ‘आता हे सर्व प्रकरण फार पुढे गेले आहे, मी मागे येणार नाही,’ असे रांजणेंनी ठामपणे सांगितले. रामराजेंसह मकरंद पाटलांनी त्यांना समजावून सांगत स्वीकृत संचालक करण्याची ऑफर दिली; पण ही ऑफरही धुडकावून लावत त्यांनी चर्चा थांबवली. राष्ट्रवादीची नेतेमंडळी जिल्हा बॅंकेत येऊन थांबले होते.

हेही वाचा: आमदार शिंदेंसाठी शरद पवारांचा थेट 'या' आमदारांना फोन

जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे व ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदारांसमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्याच नेत्यांना ऑफर दिली. मानकुमरे म्हणाले, ‘‘शरद पवार आणि अजित पवार हे आम्हाला आदरणीय असून, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांचा आम्हाला अवमान करायचा नाही; पण आमदार शिंदे हे दोन पंचवार्षिक बॅंकेचे संचालक आहेत. यावेळेला कार्यकर्ते व मतदारांच्या आग्रहास्तव आम्ही रांजणे यांना निवडून आणणार आहोत. आमदार शिंदेंना आम्ही विनंती केली होती. तुम्ही दोन पंचवार्षिक या तालुक्यातून आमदार राहिला आहात. आता लोकांनीच दुसऱ्या व्यक्तीला संधी देण्याचा निर्णय केला असून, रांजणेंना बहुमत देण्याचा निर्णय केला आहे. त्यांनी रांजणेंना स्वीकृतची ऑफर दिली आहे; पण आम्ही त्यांना एक पर्याय दिला आहे. रांजणेंना पहिली एक वर्षे सोसायटीतून संचालक करा. त्यानंतर चार वर्षांनी त्यांना स्वीकृत संचालक करा. आमदार शिंदेंना पुन्हा सोसायटीतून संधी द्या, अशी ऑफर दिली आहे. त्यावर त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी बोलून कळवतो, असे सांगितले आहे.’’

हेही वाचा: निवडणुकीत वेदांतिकाराजेंच्या पराभवाने नविआ बॅकफुटवर

आमच्यासोबत २८ मतदार असून, आणखी तीन मतदार असे ३१ मतदार एकत्र येऊन रांजणेंना मतदान करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे हे नम्र व चांगले नेतृत्व आहे. त्यांनी कोणताही अट्टहास केलेला नाही. त्यांनाही जावळीत संघर्ष नको आहे. शिवेंद्रसिंहराजेंप्रमाणे आमदार शिंदेंनीही अशीच भूमिका घ्यावी. त्यांच्याशी आम्हाला कोणताही वाद घालायची नाही. त्यांनी आजचा शेवटचा दिवस गोड करून आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा व आपला उमेदवार बिनविरोध निवडून द्यावा, अशी अपेक्षा श्री. मानकुमरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे आमदार शिंदेंची कोंडी फुटणार?

loading image
go to top