शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे आमदार शिंदेंची कोंडी फुटणार? राष्ट्रवादीच्या नेत्यांची इभ्रत पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची इभ्रत पणाला लागलीय.

शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे आमदार शिंदेंची कोंडी फुटणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मेढा (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) कळीचा मुद्दा ठरलेला जावळी सोसायटी (Jawali Society) मतदारसंघाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. जावळीच्या निवडणुकीची चुरस वाढवणारी व जिल्ह्याबाहेर गेलेली मतदारांची टीम आज रात्री पुन्हा जावळीत परतली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एन्ट्रीमुळे आणि वाईच्या नेत्यांच्या केलेल्या हालचालींमुळे सातारकरांच्या मध्यस्थीने मतदारांची घरवापसी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा (Shashikant Shinde) मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) व आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या भोवती फिरत राहील, असा जिल्ह्यातील सर्वांचा ग्रह झाला होता; परंतु अनप्रिडिकेटेबल समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षातील साताऱ्यातील धुरिणांनीही या निवडणुकीत सर्वांच आडाखे उधळून लावले. उदयनराजेंना बिनविरोध सेट केले गेले, तर जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची इभ्रत पणाला लागली. त्यामध्ये जावळी सोसायटी गटातील शशिकांत शिंदेंची झालेली कोंडीही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या चांगलीच जिव्हारी लागली. इतर कोणत्याही मतदारसंघापेक्षा या निवडणुकीत शशिकांत शिंदेंबाबत झालेल्या राजकारणाची जिल्हाभर चर्चा होत होती.

हेही वाचा: मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात

जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा पाया भक्कम होण्यासाठी काम करणाऱ्या नेत्यांमध्ये शशिकांत शिंदे नेहमीच अग्रेसर राहिले. त्यामध्ये मागील विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील त्यांचा सहभाग संपूर्ण जिल्ह्याने अनुभवला. पक्ष व त्याच्या नेतृत्वासाठी दिलेल्या योगदानाची राष्ट्रवादीकडून योग्य ती जाण ठेवली गेली नाही, अशीच भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली होती. ‘सकाळ’नेही कार्यकर्त्यांच्या या भावनेला वृत्ताच्या माध्यमातून वाट मोकळी केली होती. शशिकांत शिंदे यांनीही ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी कंबर कसलीच होती; परंतु या दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये चाललेल्या या करामतींमध्ये लक्ष घातले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक समजले जाणारे व राष्ट्रवादीतच आहेत, असे सांगितले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी आजवर शशिकांत शिंदे निवडून येत असलेल्या जावळी सोसायटी गटातून अर्ज भरला. हा अर्ज मागे घेतला जाईल, असा सर्वांचा कयास होता; परंतु अर्ज माघारीच्या दिवशी ही अपेक्षा फोल ठरली. ज्ञानेदव रांजणे यांनी अर्ज काढलाच नाही; परंतु २८ मतदारांना घेऊन ते नॉट रिचेबल झाले होते. ५९ मतदार असलेल्या जावळी सोसायटीच्या निवडणुकीत त्यामुळे राष्ट्रवादी व पयार्याने आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता.

हेही वाचा: महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'

शशिकांत शिंदेंचे मतदार जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू होते. त्याला कितपत यश येईल याची शंका कार्यकर्त्यांना होती; परंतु शशिकांत शिंदेंसमोर निर्माण केलेली ही कोंडी अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच फोडल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांनी वाईच्या नेत्यावर जबाबदारी दिली. या नेत्याने हा पेच सोडवू शकणाऱ्या साताऱ्याच्या नेत्याशी चर्चा करून यावर शंभर टक्के मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच कारवार, गोवा, चिपळूण असा प्रवास करत मतदारांची टिम आज साताऱ्यात पोचली. अधिकृत दुजारा नसला तरी साताऱ्यातील नेत्याने प्रत्यक्ष गोपनीय ठिकाणी जाऊन शिष्टाई करत सर्वांना साताऱ्यात आणल्याचे बोलले जात आहे. जावळीतून गेलेल्या टिमची घर वापसी झाली आहे. त्यांच्याकडून जावळी सोसायटी गटात शशिकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्या जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा मार्ग निर्धोक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: BJP आमदाराच्या 'या' विधानामुळे NCP आमदाराचा विजयाचा मार्ग मोकळा?

loading image
go to top