सावकाराच्या घरात रायफल, पिस्टल, बारा बोअर बंदुकीसह दोन जिवंत काडतुसे सापडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

श्री. पाटील यांच्या फिर्यादीनुसार गोडसेवर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, सावकारीच्या या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता पोलिस वर्तवत आहेत.
 

सातारा : खिंडवाडी (ता. सातारा) येथील खासगी सावकाराच्या घरात पोलिसांना रायफल, पिस्टल व बारा बोअर बंदुकीची दोन जिवंत काडतुसेही सापडली. त्यामुळे सावकारी प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सावकारीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.
 
याबाबत पोलिस उपनिरीक्षक अमित गणपती पाटील यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानदेव आनंदराव गोडसे (रा. खिंडवाडी) असे या खासगी सावकाराचे नाव आहे. व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी करंडी (ता. सातारा) येथील एकाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी या सावकारावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची फिर्याद दीपक सुभानराव जाधव (रा. करंडी) यांनी दिली होती. जाधव यांनी गोडसेकडून महिना दहा टक्के व्याजदराने दहा लाख 40 हजार रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी 31 लाख 20 हजार रुपये दिले. तरीही गोडसेची पैशाची मागणी सुरू होती. त्याला नकार दिल्याने पाच जूनला गोडसेने जाधव यांचे अपहरण करून औद्योगिक वसाहत व इतर ठिकाणी फिरवले. या वेळी ते त्यांना मारहाण करून त्यांची आई व भावाला पैशासाठी फोनवरून धमकी देत होते, असे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
 
या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे होता. त्यांनी गोडसेला अटक केली. त्यानंतर शनिवारी (ता. 27) त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. त्या वेळी पोलिसांना एक रायफल, एक पिस्टल व बारा बोअर बंदुकीची दोन जिवंत काडतुसे सापडली. या बंदुकीचा गोडसेकडे कोणताही परवाना नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे श्री. पाटील यांच्या फिर्यादीनुसार गोडसेवर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, सावकारीच्या या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता पोलिस वर्तवत आहेत.

काळजीत पडला सातारा जिल्हा; लहान बालकांना कोरोनाची बाधा; एकूण संख्या हजारी पार

पाच वर्षांच्या चिमुकलीला आईने गॅलरीतून फेकून दिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Money Lender In Satara District