
चिमणगावात सरकारमान्य रेशन दुकानात दारूविक्री; सात लाखाचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव (सातारा) : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सात लाख आठ हजार 576 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश एकनाथ जाधव (रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे. चिमणगाव येथे एक जण त्याच्या मालकीच्या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये बेकायदेशीरपणे दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुरुवारी (ता. 28) मिळाली होती. त्याआधारे त्यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार या पथकाने गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास चिमणगाव हद्दीतील त्या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये अचानकपणे छापा टाकला.
साताऱ्यात कोरोनाचा कहर; पोलिस बंदोबस्तात निढळच्या सर्व सीमा बंद
त्या वेळी दुकानामध्ये व दुकान मालकाचे जीपमध्ये (एमएच 11 बीव्ही 3553) आढळून आलेला देशी- विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण सात लाख आठ हजार 576 एवढ्या किमतीचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश गजें, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलिस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी ही कारवाई केली. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल रोहित जगन्नाथ निकम यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Edited By : Balkrishna Madhale
Web Title: Case Registered Against One Person From Chimangaon For Selling Liquor Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..