साताऱ्याच्या राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 13 September 2020

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक संस्था व नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा : राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज (रविवार) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत. 

महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णांलयामध्ये उपचार सुरु होते.

काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते. दरम्यान, आज (रविवार) दुपाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. चंद्रलेखाराजे भोसले या खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या चुलती होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक संस्था व नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी केव्हा केला जाणार याची माहिती कुटुंबियांकडून अद्याप सांगण्यात आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandralekharaje Bhosale Adalat Rajwada Satara News