सिव्हिलमध्ये कॅन्सरग्रस्तांची परवड; कोरोनामुळे आठ महिन्यांपासून केमोथेरपी सेंटर बंद

प्रवीण जाधव
Wednesday, 4 November 2020

पैशाअभावी उपचाराकडे दुर्लक्ष होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत होते. त्याचा विचार करून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात कर्करोगावरील उपचार मोफत मिळून त्यांच्यावर औषधोपचार करता यावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावरील केमोथेरपी सेंटर सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे या सुविधेपासून जिल्ह्यातील रुग्ण गेल्या आठ महिन्यांपासून वंचित राहिले आहेत.

सातारा : कर्करोगाच्या आजारासाठी लागणाऱ्या भरमसाट खर्चापासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची काही प्रमाणात सुटका करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सुरू झालेले केमोथेरपी सेंटर गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सामान्य कुटुंबातील रुग्ण व नातेवाईकांची परवड होत आहे. ती टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील केमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्याबरोबर राज्यात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. या आजारावर राज्यातील ठराविकच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार होत होते. त्यामुळे त्या ठिकाणी मर्यादित रुग्णांवरच उपचार होत होते. त्यासाठीही नागरिकांना संबंधित ठिकाणी जाण्याचा, नातेवाईकांना राहण्याचा व इतर खर्च सोसावा लागत होता. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांत भरमसाट पैसे खर्च करून पदरमोड करावी लागत होती. अनेकांना आपल्या कुटुंबाची आयुष्यभराची पुंजी त्यासाठी वापरावी लागत होती. तरीही अनेकांसाठी या उपचारावरील खर्च करणे आवाक्‍याबाहेर होते.

राजकारणात मोठी घडामोड! कऱ्हाडात कट्टर विरोधक येणार एका व्यासपीठावर 

पैशाअभावी उपचाराकडे दुर्लक्ष होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत होते. त्याचा विचार करून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात कर्करोगावरील उपचार मोफत मिळून त्यांच्यावर औषधोपचार करता यावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावरील केमोथेरपी सेंटर सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यांत हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातही केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याचा जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांना लाभ मिळत होता. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरही हा चांगला उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत सुरू करण्याचा मनोदय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला होता. मात्र, कोरोनामुळे या सुविधेपासून जिल्ह्यातील रुग्ण गेल्या आठ महिन्यांपासून वंचित राहिले आहेत. केमोथेरपीसाठी वापरण्यात येणाऱ्या वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता. 

साता-यासह खटाव, माण, काेरेगाव तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

दोन्ही विभाग लवकरात लवकर सुरू करू 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केमोथेरपी सेंटर आणि नेत्र रुग्णालय या दोन्ही विभागांतून रुग्णसेवा देताना अडचणी येत होत्या. हे दोन्ही विभाग जवळपास बंद होते. मात्र, आती सर्व आढावा घेऊन हे दोन्ही विभाग लवकरात लवकर सक्षमपणे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chemotherapy Center In Satara Has Been Closed For Eight Months Due To Corona