साताऱ्यात 'शंभर मॉडेल शाळा' योजना राबविणार : विनय गौडा

प्रशांत घाडगे
Saturday, 17 October 2020

सद्य:स्थितीत कोरोनाच्या जागतिक स्तरावरील लढा सुरू आहे. या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील संख्या आटोक्‍यात येण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी नुकतेच शहरात जम्बो हॉस्पिटल सुरू केल्याने रुग्णांना उत्तम सुविधा मिळत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

सातारा : नंदुरबार जिल्हा परिषदेत काम करताना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये "शंभर मॉडेल शाळा' योजना राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करून "शंभर मॉडेल शाळा' योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीचे दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणार असल्याने पटसंख्या निश्‍चितपणे वाढणार आहे, असे मत जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. याचबरोबर शिक्षण, स्वच्छता, ग्रामपातळीवर योजना, पर्यटन, कोरोनाशी लढा आदी विविध विषयांवरील उपाययोजनांबाबत चर्चा केली. 

सद्य:स्थितीत कोरोनाच्या जागतिक स्तरावरील लढा सुरू आहे. या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील संख्या आटोक्‍यात येण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी नुकतेच शहरात जम्बो हॉस्पिटल सुरू केल्याने रुग्णांना उत्तम सुविधा मिळत आहेत. याचबरोबर, ग्रामपंचायत पातळीवर कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनीही कोरोनाचा आजार रोखण्यासाठी स्वत:हून काळजी घ्यावी, असे आवाहन गौडा यांनी केले. 

दरे बुद्रुकची अवस्था ना घर का, ना घाट का!

सातारा जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषीविषयक अनेक योजना राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. याचबरोबर, घरकुल योजना, नागरिकांसाठी शुध्द पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आदी योजना प्रभावीवणे राबवित शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याकडे कल वाढविणार आहे. सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या पध्दतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या सुविधा देताना सोशल मीडियाचा अतिशय प्रभावीपणे वापर करणार असल्याचे गौडा यांनी सांगितले. 

होय! शिवेंद्रसिंहराजे मला भेटले, आमच्यात चर्चाही झाली : अजित पवार

प्रशासकीय व राजकीय समन्वय राखणार 

सातारा जिल्हा परिषदेमध्ये योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणार आहे. नागरिकांनीही योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. योजना राबविताना प्रशासकीय व राजकीय यांच्यात समन्वय राखणार आहे. याचबरोबर देशपातळीवर विकासाच्या कामातून सातारचा नावलौकिक वाढविणार असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Executive Officer Vinay Gowda Testified That The Hundred Model Schools Scheme Will Be Implemented In Satara