सातारा : क्वारंटाइन सेंटरमध्ये नको रे बाबा...; प्रशासनाची उडणार धांदल?

सातारा : क्वारंटाइन सेंटरमध्ये नको रे बाबा...; प्रशासनाची उडणार धांदल?

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे क्‍वारंटाइन कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या ताणामुळे जिल्ह्यातील या सेंटरमधील सुविधांवरही प्रतिकूल परिणाम होऊ लागलेला आहे. त्यामुळे अशा सेंटरमध्ये जाण्यासाठी नागरिकांची ओरड सुरू झालेली आहे. त्यातूनच क्वारंटाइन सेंटरमध्ये नको रे बाबा... अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचा विरोध वाढल्यास संशयितांना त्याठिकाणी नेण्यास प्रशासनाची दमछाक होऊ शकते. त्यामुळे क्‍वारंटाइन सेंटरमध्ये योग्य सुविधा उपलब्ध होतील, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जातीने लक्ष घालण्याची आवश्‍यकता आहे.
पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा  

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या दररोज बाधितांचा आकडा 150 ते 200 रुग्णांपर्यंत जात आहे. त्यामुळे या बाधितांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना क्‍वारंटाइन करण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून राबविली जात आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाधितांच्या संपर्कातील सुमारे 500 ते 600 नागरिकांना क्वारंटाइन केले जात आहे. क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीचा सुरवातीला एकदा नमुना घेतला जातो. त्यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल केले जाते. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे रुग्णालयातील बेडही अनेकदा अपुरे पडतात. त्यामुळे लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनाही सध्या क्वारंटाइन सेंटरमधील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. आवश्‍यकता असेल तरच त्यांना रुग्णालयात नेण्यात येते.

आनंदाची बातमी...प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना आता चक्क डॉक्‍टर!
 
ज्यांचे पहिले अहवाल निगेटिव्ह येतात, त्यांनाही निगराणीसाठी काही दिवस क्‍वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. आठ ते दहा दिवसांनंतर पुन्हा त्या व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेतला जातो. तो निगेटिव्ह आल्यानंतर संबंधिताला घरी सोडण्यात येते. तोपर्यंत संबंधित व्यक्तीही आरोग्य विभागाच्या देखरेखीमध्ये असते. अशा संपर्कातील संशयितांना ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी 41 क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये या व्यक्तींना राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी प्रशासनाचा दररोज लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतो.

Video पहा : सातारा : या गावातील गणेशमूर्ती मुंबईकरांच्या मखरात होणार विराजमान 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या सध्या चार हजार 252 झाली आहे. त्यातील दोन हजार 29 रुग्ण सध्या उपचारार्थ आहेत. त्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार 300 च्यावर आहे. या रुग्णांबरोबरच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील क्वारंटाइन केलेलेही क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. वाढत्या संख्येमुळे या ठिकाणच्या व्यवस्थेवर ताण पडतो आहे. त्यामुळे तेथे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे तीन-तेरा वाजू लागले आहेत. 

हा नेता म्हणाला... नियमांचे काटेकोरपणे पालन करा

जिल्ह्यातील खंडाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील गैरसोयी मध्यंतरी चव्हाट्यावर आल्या होत्या. परंतु, सर्वांत महत्त्वाचे येथील सुविधांबाबतचा प्रसार होत आहे, तो क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांकडून. या ठिकाणी राहत असताना आलेल्या गैरसोयींच्या व झालेल्या त्रासाच्या, प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षाच्या सुरस कहाण्या त्या नातेवाईकांना सांगत आहेत. त्यामुळे गावोगावी येथील गैरसोयींचा पाढा सध्या प्रत्येकाच्या कानावर पडत आहे. जेवणाचा दर्जा, त्याच्या वेळा, स्वछतेकडे असणारे दुर्लक्ष याचा त्यात समावेश आहे. त्याचीच परिणीती या सेंटरबद्दल नागरिकांच्या मनात गैरसमज पसरण्यात होतो आहे. त्यामुळे संशयित असलो तरी आम्हाला घरीच ठेवा. क्वारंटाइन सेंटरमध्ये नको रे बाबा... अशी नागरिकांची मानसिकता बनत चालली आहे. त्यातच घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात होणारी दिरंगाई, त्यासाठी होणारी ताटकळ याचाही नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संशयितांना क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यासाठी कर्मचाऱ्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. महाबळेश्‍वरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकारही त्याच भीतीचा परिपाक आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा योग्य राहतील, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. अन्यथा जिल्ह्यातील अन्य भागातही संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. संकटाच्या या काळात नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेतच. परंतु, त्यामुळे प्रशासनाने त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करावे, हे योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष देऊन क्वारंटाइन सेंटरच्या सुविधांचा दर्जा सुधारणे आवश्‍यक आहे.

 पाटणमध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती; बळीराजा हवालदिल

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दूधाच्या दरासाठी आंदाेलन झाले. त्याचा आढावा

होम क्‍वारंटाइनला हरताळ 

ज्या नागरिकांकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, त्यांना होम क्‍वारंटाइन राहण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध केलेला आहे. अगदी बाधितांसाठीही सवलत आहे. परंतु,नमुने घेत असताना अहवाल येईपर्यंत रुग्णालय किंवा क्‍वारंटाइन सेंटरमध्ये राहण्याची सक्ती आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्या ठिकाणी गेलो तरी बाधित होऊ, अशी भीती नागरिकांच्या मनात घर करू लागली आहे. त्यामुळे होम क्‍वारंटाइनच्या अंमलबाजवणीबाबत योग्य ती कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com