ऐन कोरोनात रेशनवर धान्यटंचाई; एपीएलचे धान्य केले बंद!

उमेश बांबरे
Sunday, 27 September 2020

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी होत नाही. पण, लॉकडाउन शिथिल असल्याने सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. पण, म्हणावी तेवढी उलाढाल होत नाही. परिणामी, नागरिकांना अन्नधान्यासाठी रेशनवरील धान्याची वाट पाहावी लागत आहे. शासनाकडे धान्यच उपलब्ध नसल्याने या स्वस्तात मिळणारे धान्य बंद केल्याचे पुरवठा विभागाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांची ऐन कोरोनाच्या काळात निराशा झाली आहे.

सातारा : कोरोनाची परिस्थिती जिल्ह्यात दिवसेंदिवस बिकट होत असताना गेल्या तीन महिन्यांपासून केशरी कार्ड (एपीएल) धारकांना मिळणाऱ्या स्वस्तातील धान्याचा कोटाच शासनाकडून जिल्ह्याला मिळालेला नाही. शासनाकडे धान्याचा तुटवडा असल्याने हा कोटा बंद केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख लाभार्थ्यांना स्वस्तातील धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. धान्यटंचाई कायम राहिल्यास मोफत मिळणारे धान्यही बंद होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. 

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी होत नाही. पण, लॉकडाउन शिथिल असल्याने सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. पण, म्हणावी तेवढी उलाढाल होत नाही. परिणामी नागरिकांना अन्नधान्यासाठी रेशनवरील धान्याची वाट पाहावी लागत आहे. प्राधान्य कुटुंबे व दारिद्य्ररेषेखालील लाभार्थ्यांना कोरोनाच्या काळात शासनाने मोफत धान्य दिले. यासोबतच एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी केशरी कार्डधारकांनाही स्वस्तात धान्य उपलब्ध केले. त्यामुळे ऐन कोरोना संसर्गाच्या काळात असलेल्या बंदमध्येही नागरिकांना दिलासा मिळाला. त्यानंतर शासनाने नागरिकांना अधिक दिलासा देण्यासाठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांकरिताही स्वस्तात धान्य उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ज्यांची कार्ड ऑनलाइन नोंद आहेत, अशा केशरी तसेच रेशनकार्ड नसलेल्यांचाही यामध्ये समावेश केला. त्यानुसार पुरवठा विभागाने या तीन महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्य कोट्याची मागणीही केली. पण, गेल्या तीन महिन्यांपासून धान्यच उपलब्ध झालेले नाही.

कन्या दिवस : मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख 

सातत्याने पाठपुरावा करूनही धान्य उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांना धान्य मिळाले नाही. परिणामी, सुमारे साडेतीन लाख लाभार्थी या धान्यापासून वंचित आहेत. आता शासनाकडे धान्यच उपलब्ध नसल्याने या स्वस्तात मिळणारे धान्य बंद केल्याचे पुरवठा विभागाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांची ऐन कोरोनाच्या काळात निराशा झाली आहे. शासनाकडे धान्य उपलब्ध नसल्याचे कारण सांगून स्वस्तातील धान्य बंद झाले असल्याने आगामी काळात मोफत दिले जाणारे धान्य तरी नियमित मिळणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

World Tourisim Day : कोयना पर्यटन पुन:श्‍च हरिओमच्या प्रतिक्षेत

 
जिल्ह्यातील शिधापत्रिका 

- जिल्ह्यातील रेशनकार्डची संख्या : सहा लाख 17 हजार 571 
- केशरी कार्डधारक : 3 लाख 76 हजार 963 
- अंत्योदयचे कार्डधारक : 28 हजार 493 
- शुभ्र कार्डधारक : दोन लाख 10 हजार 123 (धान्य न मिळणारे) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Have To Wait For Foodgrains On Rations For Foodgrains Satara News