ढेबेवाडी-पाटण प्रवास..'घोडं खाईना भाडं'; बस स्थानकात सन्नाटा

राजेश पाटील
Saturday, 31 October 2020

ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा 33 किलोमीटरचा मार्ग आहे. तालुक्‍याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने येथील नागरिकांची पाटणला नित्य वर्दळ असते. या मार्गावर सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत पाटण एसटी आगाराच्या अनेक गाड्या धावतात. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विस्कळित झालेली बससेवा अद्याप सुरळीत न झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत.

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात बंद ठेवलेली ढेबेवाडी-पाटण मार्गावरील एसटी बससेवा अद्याप पूर्ववत न झाल्याने नोकरी, व्यवसाय व कामानिमित्ताने तालुक्‍याच्या गावी जाणाऱ्या ढेबेवाडी खोऱ्यातील नागरिकांची स्थिती "घोडं खाईना भाडं' अशीच काहीशी झाली आहे. ढेबेवाडी-पाटण हे 33 किलोमीटरचे अंतर असताना नागरिकांना कऱ्हाडमार्गे 64 किलोमीटरचा प्रवास करून पाटणला जावे लागत आहे. 

ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा 33 किलोमीटरचा मार्ग आहे. तालुक्‍याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने येथील नागरिकांची पाटणला नित्य वर्दळ असते. या मार्गावर सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत पाटण एसटी आगाराच्या अनेक गाड्या धावतात. पाटण आगाराच्या तीन बस रात्री येथे मुक्कामीही असतात. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विस्कळित झालेली बससेवा अद्याप सुरळीत न झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत. 

कोरोनाच्या खात्म्यासाठी सातारा जिल्ह्याला तब्बल 40 कोटी; चाचण्या वाढविण्याची तयारी सुरु

सध्या ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू असली, तरी पाटण आगार मात्र प्रवाशांची गैरसोय कशासाठी करतंय? हे न उमगणारे कोडेच आहे. ढेबेवाडी-पाटण हे 33 किलोमीटरचे अंतर असताना येथील नागरिकांना कऱ्हाडमार्गे 64 किलोमीटरचा प्रवास करून पाटणला जावे लागत आहे. त्यामुळे 45 रुपयांऐवजी 80 रुपयांचा भुर्दंड बसत असल्याने प्रवाशांची स्थिती "घोडं खाईना भाडं' अशीच झाली आहे. वडाप बंद, अंतर्गत एसटी वाहतूक बंद यामुळे सात महिन्यांपासून वैतागलेल्या ढेबेवाडी खोऱ्याला पाटण मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत करून दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

गडकरी साहेब, महाराष्ट्रातील एनएचएआयच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवा 

वाहतूक नियंत्रकच नाही... 

एसटीला दिवसभरात लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारे ढेबेवाडी खोरे सध्या एसटी बंद असल्यामुळे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे. सध्या ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील बस फेऱ्या सुरू असल्या, तरी पाटण मार्गावर मात्र सामसूमच आहे. साफसफाई अभावी अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या येथील स्थानकाची मध्यंतरी साफसफाई करण्यात आली असली, तरी वाहतूक नियंत्रक कक्ष बंद असल्याने स्थानकाला कुणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती येथे आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Trouble Due To Closure Of All Rounds Of Dhebewadi-Patan ST Bus Satara News