
येत्या काही काळात तापमान आणखी घसरणार असून थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. घसरलेले तापमान हे रब्बीसाठी लाभदायक राहणार असले तरी पाऊस येऊ नये असे शेतक-यांची भावना आहे.
सातारा : सातारा शहर आणि परिसरात आज (शनिवार) कमालीचा गारठा वाढला आहे. गेल्या दोन दिवसात किमान तापमान एक ते दाेन अंशाने घसरले आहे. त्यामुळे दिवसभर थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, पाचगणी या भागात तर थंडीचा आनंद लुटत पर्यटक मक्याच्या कणसांवर ताव मारत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरू लागले आहे. बोचरी थंडीनंतर आता गारठा वाढू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसात त्याचा अनुभव जिल्हावासीय घेत आहेत. गेल्या दोन दिवसात तर किमान तापमानाचा पारा हा एक ते दाेन अंशाने घसरला आहे.
गेल्या महिन्यात अर्थात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत होता. कडक ऊन आणि असह्य उकाड्याने नागरिकांना हैराण केले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र तापमानात बदल होत गेला. नोव्हेंबर महिना तर थंडी घेऊनच आला. पहिल्या आठवड्यात बोचरी थंडी होती. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहेत.
आज (शनिवार) सकाळपासून शहरातील विविध रस्त्यांवर नागरिकांची तुरळक गर्दी आहे. बहुतांश चाैकांमधील चहाच्या टपरीवर नागरिक चहाचा आस्वाद घेताना दिसले. राजवाडा, पाेवई नाका येथील रिक्षा स्टाॅपवरील रिक्षा चालकांच्या कानटाेप्या दुपारी दाेन वाजेपर्यंत डाेक्यावरुन उतरल्या नव्हत्या. शेंगा, मक्याचे कणीस, कांदा भजी अशा खाद्यपदार्थांवर नागरिक ताव मारताना दिसत हाेते.
काेरेगाव तालुक्यातील साेळशी येथे दुपारी एकच्या सुमारास ग्रामस्थांनी शेकाेट्या पेटविल्या हाेत्या. महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले पर्यटक वेण्णा लेक परिसरात फे-या मारताना मक्याची कणीस खाण्याचा आनंद लुटत हाेते. माण तालुक्यात काही भागात हलकासा पाऊस झाला.
दरम्यान रात्रीचे किमान तापमान १५ ते १८ अंशावर होते ते आता 16 अंशांपर्यंत घसरले आहे. येत्या काही काळात तापमान आणखी घसरणार असून थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. घसरलेले तापमान हे रब्बीसाठी
लाभदायक राहणार असले तरी पाऊस येऊ नये असे शेतक-यांची भावना आहे.
सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय