आल्याच्या दरात दिलासादायक वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ginger planting season start now

आल्याच्या दरात दिलासादायक वाढ

काशीळ - कोरोनाच्या संसर्गानंतर आले पिकांत झालेल्या घसरणीने आले उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पिकांच्या दरात अल्पशी सुधारणा झाली आहे. आले पिकाच्या प्रति गाडीमागे (५०० किलो) सहा ते सात हजार दरात वाढ झाली आहे. सध्या प्रति गाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला आहे.

आले पिकाच्या गेल्या चार ते पाच वर्षांपासून संकटाच्या गर्तेत सापडले होते. कोरोनाचा संसर्ग राहिल्याने दरात कायम घसरण, वाढलेल्या किडी, रोग व त्यामुळे वाढलेला भांडवली खर्च, यामुळे आले उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. त्यामुळे आल्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेले दोन वर्षांपासून प्रति गाडीस चार ते सहा हजार रुपयांवर दर गेले नव्हते. हा दर न परवडणारा व उत्पादन झालेली घट यामुळे काही शेतकऱ्यांनी आले न काढता तसेच जमिनीत ठेवले होते.

सध्या मात्र जून महिन्यापासून दरात अल्पशी वाढ होण्यास सुरवात झाली आहे. प्रति गाडीमागे सहा ते सात हजार रुपये दरात सुधारणा होऊन सध्या प्रति गाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागले आहे. सलग चार वर्षे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा मिळत असलेला दर काही प्रमाणात दिलासादायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खते, औषधे यांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने आल्याच्या भांडवलात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर कमी असल्याने आले पिकाची आर्थिक गणिते जुळत नव्हती. दरात झालेली सुधारणा झाल्याने किमान भांडवली खर्च निघू शकतो. मात्र, दर स्थिर राहण्याची आवश्‍यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

क्षेत्रात झाली घट...

तीन वर्षांत आले उत्पादक कमालीचा अडचणीत आल्याने नवीन आले लागवडीचा कल कमी झाला आहे. मिळणारा दर व उत्पादन याचा मेळ बसत नसल्याने किमान ३० ते ४० टक्के आले पिकाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या घटीमुळे आल्याचे उत्पादन कमी होणार आहे.

मागील तीन वर्षांत आले पिकाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, मागील महिन्यापासून आल्याची मागणी वाढू लागल्याने दरात वाढ होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रति गाडीस सरासरी १४ हजारांपासून १६ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

-अमित यादव, आले व्यापारी, सासपडे, सातारा.

Web Title: Comforting Rise In Ginger Prices

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top