कोरोना निवारणासाठी त्यांनी केले दीड कोटी खर्च 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

आतापर्यंत दीड कोटी रुपये म्हणजेच 50 टक्के निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी आणखी उपाययोजना व उपचारांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्य व केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून दीड कोटी रुपये कोरोना निवारणासाठी खर्च झाले आहेत. सर्वाधिक निधी विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर खर्च झाले आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आणखी दोन कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. संसर्ग वाढण्याचे प्रमाण कमी झाले नाही, तर आणखी निधी उपलब्ध करावा लागणार आहे. 

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या 571 झाली असून, सध्या 324 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6399 संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित असलेले 223 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने क्रांजतसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

प्रत्येक तालुक्‍यात एक व सातारा तीन, कऱ्हाडला दोन असे 16 कोरोना केअर सेंटर सुरू केले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना  इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे. या क्वारंटाइन केलेल्या रुग्णांवर आतापर्यंत दीड कोटी रुपये खर्च झालेले आहेत. यामध्ये क्वारंटाइन कक्षाच्या खर्चासह मास्क, सॅनिटायझर, आवश्‍यक मेडिसीन, व्हेंटिलेटर, तसेच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

यासोबत ज्या-ज्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून खासगी हॉस्पिटल अधिगृहित केलेली आहेत, त्या हॉस्पिटलला जिल्हा प्रशासन झालेला खर्च देणार आहेत. कृष्णा हॉस्पिटललाही जिल्हा प्रशासन आतापर्यंत कोरोना रुग्णांवर केलेल्या उपचारापोटी खर्च देणार आहे. यामध्ये स्टाफचा वापर, औषधे, किट्‌स, मास्क, सॅनिटायझर, तसेच साहित्य आदींचा समावेश आहे.

जिल्ह्याला राज्य व केंद्र शासनाकडून कोरोनासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून आतापर्यंत दीड कोटी रुपये म्हणजेच 50 टक्के निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी आणखी उपाययोजना व उपचारांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. 

कोरोना केअर सेंटर वाढणार 
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी तसेच इतर कोरोनासदृश लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आणखी कोरोना केअर सेंटर वाढविली जाणार आहेत. यासाठी मोठ्या शाळा, हॉस्पिटल्स, मंगल कार्यालये अधिगृहित केली जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Corona Cure Satara District Administrator Spend 1.5 Crore