व्यायाम, आहार, औषधोपचार त्रिसूत्रीतून कोरोनाला हरविले : मीनल ढापरे

सचिन शिंदे
Friday, 16 October 2020

कोरोना गंभीर असला तरी सकारात्मक ऊर्जा त्याला हरवते. तुम्ही किती सकारात्मक आहात, त्याचा तुमच्या मानसिकेतवर परिणाम होतो. कोरोना झाला म्हणून घाबरायचे नाही, व्यायामावर भर, वेळेवर सकस आहार, सकारात्मक विचारांचे वाचन करायचे ही त्रिसूत्री पाळल्यास कोरोना राहत नाही.

कऱ्हाड : आमच्या कुटुंबात गणेशोत्सवातच कोरोनाची एन्ट्री झाली. मोठे दीर बाधित झाले. त्याबरोबर त्यांची पत्नी, माझी दोन्ही मुले पॉझिटिव्ह आली. मुलांना होम आयसोलेशन केले. दीर, जाऊबाई यांना रुग्णालयात दाखल केले. विसर्जनादिवशी मला कोरोनाची बाधा झाली. घरातील सात जणांसह काम करणाऱ्या तिघांनाही लागण झाली. मोठ्या जाऊबाईंचे रुग्णालयातच ऑक्‍सिजन कमी झाल्याने निधन झाले. कुटुंब हादरले. काय करावे, हेच सुचत नव्हते. मात्र, खंबीर सकारात्मक मानसिकता ठेवत कोरोनाशी दोन हात केले. सकारात्मक ऊर्जा मनाशी कोरली. त्यात आम्ही यशस्वी झालो असे येथील मीनल ढापरे यांनी नमूद केले. 

कृष्णा रुग्णालयात उपचार चांगले झाले. जेवणातील सकसपणा, मनातील सकारात्मकता, कोरोनाची वेळेवर घेतली जाणारी औषधे अन्‌ व्यायामातील सातत्यामुळे कोरोनावर मात केली. रुग्णालयातून तब्बल 14 दिवसांनी कोरोनामुक्त झालो. मात्र, आम्ही आमच्या जाऊबाईंना वाचवू शकलो नाही, त्याचे अपार दुःख आज होते आहे. कोरोनाशी दोन हात करताना तुम्ही सकारात्मकता ठेवण्याची गरज आहे. गणेश विसर्जनादिवशी ताप आला. त्यानंतर चव गेली की, लगेच मी तपासणी केली. त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापूर्वीच दीर, जाऊबाईंसह माझी दोन्ही मुले पॉझिटिव्ह होती. त्यानंतर पतीही पॉझिटिव्ह आले. आमच्याकडे काम करणारा मुलगा होता. तो रक्षाबंधनाला त्यांच्या घरी जाऊन आला. तो पुन्हा कामावर आल्यानंतर त्याला ताप आला. त्याला स्वतंत्र आयसोलेट करून ठेवले. मात्र, त्यानंतर दीर, जाऊबाई, दोन्ही मुले पॉझिटिव्ह आली. आमच्याकडे काम करणाऱ्या दोन मावशींसह पतीच्या ऑफिसमधीलही एकजण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तब्बल 11 जण पॉझिटिव्ह आले.

तहसिलदारांच्या रिकाम्या खुर्चीलाच गाऱ्हाणे; सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा फंडा!

त्यात माझ्या जाऊबाईंचे निधन जिव्हारी लागले आहे. कोरोनाच्या काळात मनात भीती असते. ती आपसुक येते, त्याला कटाक्षाने घालवणे आपल्याच हातात असते. त्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, मनात सकारात्मक विचार, योग्य औषधोपचार अशी त्रिसूत्री महत्त्वाची ठरते. आमच्या कुटुंबात जाऊबाईंचे निधन दुर्दैवी होते. मात्र, सगळ्यांनी एकमेकांना सावरून व सांभाळून घेतल्यानेही कोरोनाला हरवू शकलो. त्यावर मातही केली.

नवरात्रोत्सव साधेपणाने करणार ;  कोल्हापूर शहरातील बहुतांश मंडळांचा निर्णय

कोरोना गंभीर असला तरी सकारात्मक ऊर्जा त्याला हरवते. तुम्ही किती सकारात्मक आहात, त्याचा तुमच्या मानसिकेतवर परिणाम होतो. कोरोना झाला म्हणून घाबरायचे नाही, व्यायामावर भर, वेळेवर सकस आहार, सकारात्मक विचारांचे वाचन करायचे ही त्रिसूत्री पाळल्यास कोरोना राहत नाही.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronafighter Minal Dhapre Expressed Views After Recovered From Covid 19 Satara News