esakal | मित्रमंडळींनी वाढविलेल्या मनोबलामुळे गाडले कोरोनाला : श्रीराम कुलकर्णी
sakal

बोलून बातमी शोधा

मित्रमंडळींनी वाढविलेल्या मनोबलामुळे गाडले कोरोनाला : श्रीराम कुलकर्णी

घरी आल्यावर नेहमीप्रमाणे योगा, प्राणायाम, चालणे असा व्यायाम करत आहे. वेळेत झालेले उपचार, मित्रमंडळींनी वाढविलेले मनोबलामुळे कोरोनाला मूठमाती देता आली असे श्रीराम कुलकर्णी यांनी नमूद केले.

मित्रमंडळींनी वाढविलेल्या मनोबलामुळे गाडले कोरोनाला : श्रीराम कुलकर्णी

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : वयाची साठी ओलांडलेली... मधुमेह, रक्तदाबसारखा त्रास आणि त्यातच कोरोना विषाणूने बाधित झाल्यानंतर माझेच धाबे दणाणले. तर घरातील अन्य पाच लोक निगेटिव्ह झाले असले तरी त्यांना माझीच अधिक काळजी वाटत होती. जवळच्या मित्रमंडळींनी आम्हा सर्वांना धीर दिला. रुग्णालयात दाखल असतानाही माझे मनोबल वाढविले आणि बघता बघता काही दिवसांतच कोरोनाला गाडून पुन्हा ठणठणीत होऊन घरी परतल्याचे श्रीराम कुलकर्णी यांनी नमूद केले. 

ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेच्या वडूज बांधकाम विभागात मी शाखा अभियंता म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर सध्या वडूज नगरपंचायतीमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहत आहे. नगरपंचायतीमधील एका सहकाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर मला थंडी, ताप आदी त्रास जाणवू लागला. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्‍सिजनची लेव्हल कमी होती. मुळातच वयाची साठी ओलांडलेली त्यातच रक्तदाब, मधुमेह यांसारखा त्रास आणि त्यात भरीसभर म्हणून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र माझे धाबेच दणाणले. घरातील अन्य पाच व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ते सर्वजण निगेटिव्ह आल्यानंतर मला स्वत:ला हलकेसे वाटले. मात्र, माझीच काळजी कुटुंबीयांना वाटत होती.

सायगाव पोलिस पाटील यांचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखाचे सोने दिले परत 

साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल झालो. त्यावेळी नगरपंचायतीचे अध्यक्ष सुनील गोडसे, उपाध्यक्षा किशोरी पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. याशिवाय विजय कदम, श्री. नदाफ, ताजुद्दीन तांबोळी (सातारा) या मित्रांनी चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली. नगरपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये नियमितपणे फोन करून माझ्या तब्येतीची माहिती घेतली. माझ्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. माझ्या तब्येतीची विचारपूस करीत माझे मनोबल वाढविले. हॉस्पिटलमध्ये बघता बघता उपचाराचा कालावधी पूर्ण झाला आणि कोरोनाला गाडूनच तेथून ठणठणीत होऊन परत आलो. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे योगा, प्राणायाम, चालणे असा व्यायाम करत आहे. वेळेत झालेले उपचार, मित्रमंडळींनी वाढविलेले मनोबलामुळे कोरोनाला मूठमाती देता आली.

Edited By : Siddharth Latkar