वडूज कोविड सेंटरसाठी नगरसेवकाचा आक्रमक पवित्रा

अयाज मुल्ला
Thursday, 24 September 2020

खटाव तालुक्‍यात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजाराने उग्ररूप धारण केले असून, गावागावांत दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बाधित रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

वडूज (जि. सातारा) : वडूज परिसरातील नागरिकांना सर्व सोयींनीयुक्त कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी येथील नगरपंचायतीचे नगरसेवक अनिल माळी यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आमदार जयकुमार गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. 

आंदोलनात जयवंत पाटील, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, पंतप्रधान जनकल्याण योजना समितीचे खटाव तालुकाध्यक्ष प्रा. अजय शेटे, किरण काळे, राकेश सोनटक्के, महारूद्र येवले आदी सहभागी झाले होते. खटाव तालुक्‍यात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजाराने उग्ररूप धारण केले असून, गावागावांत दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बाधित रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वडूज परिसरात आणखी एक कोविड सेंटर सुरू करावे. 

आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर

वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात फक्त नावालाच कोरोना कक्ष तयार करण्यात आला असून, त्याठिकाणी रुग्णासाठी ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड नाहीत. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटर तातडीने सुरू करावे. त्यामध्ये ऑक्‍सिजन सुविधा, व्हेंटिलेटर, तसेच तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्फत रुग्णांवर उपचार करावेत. तालुक्‍यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड सेंटरला मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वाढीव ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्यांबाबत हे धरणे आंदोलन करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Agitation For Covid Center In Vaduj Satara News