'त्रिशंकू'च्या आराखड्यासाठी पालिकेची विशेष सभा बाेलवा : निशांत पाटील

गिरीश चव्हाण
Sunday, 29 November 2020

त्रिशंकू भागासाठी तज्ज्ञ लोकांची संयुक्‍त समिती स्थापन करावी, अजिंक्‍यतारा किल्ल्यासाठी पालिकेच्या वार्षिक आराखड्यात तरतूद करावी, अनुदानातील 50 टक्‍के रक्कम नव्याने समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी वापरावी, मालमत्ता करांमध्ये सवलत देण्याची मागणीही ऍड. सचिन तिरोडकर यांनी पत्रकात केली होती.

सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूर, खेड ग्रामपंचायतींच्या काही भागासह त्रिशंकू भाग पालिकेच्या अखत्यारित आलेला आहे. या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी पालिकेने ठोस आराखडा तयार करणे आवश्‍यक असून, त्यासाठी लवकरात लवकर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शाहू कलामंदिर येथे विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी नगरसेवक आणि साविआचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
 
अनेक वर्षे प्रलंबित असणारी सातारा शहराची हद्दवाढ नुकतीच राज्य शासनाने मंजूर केली आहे. या हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्या हद्दीत बराच मोठा भूभाग आणि त्यावरील लोकसंख्या सहभागी झाली आहे. या भागातील विकासकामांना चालना मिळावी व त्यासाठीचा ठोस आराखडा तयार करता यावा, यासाठी पालिकेची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी करणारे पत्र ऍड. सचिन तिरोडकर यांनी काही दिवसांपूर्वी निशांत पाटील यांना दिले होते. 

यानुसार निशांत पाटील यांनी ऍड. तिरोडकर यांच्या भूमिकेचे समर्थन करत पालिकेच्या विशेष सभेचे आयोजन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. त्रिशंकू भागासाठी तज्ज्ञ लोकांची संयुक्‍त समिती स्थापन करावी, अजिंक्‍यतारा किल्ल्यासाठी पालिकेच्या वार्षिक आराखड्यात तरतूद करावी, अनुदानातील 50 टक्‍के रक्कम नव्याने समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी वापरावी, मालमत्ता करांमध्ये सवलत देण्याची मागणीही ऍड. तिरोडकर यांनी पत्रकात केली होती. त्या मुद्यांवर चर्चा करत धोरणात्मक निर्णयासाठी सभेचे आयोजन आवश्‍यक असल्याचे मतही पाटील यांनी निवेदनात नोंदविले आहे.

कोयनानगर : शिवसागरच्या बोटिंगसाठी मानाईनगर स्पॉट निश्‍चित

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Nishant Patil Demands General Body Meeting Of Municipal Council Satara News