शरद पवारांचा 'तो' शब्द बाळासाहेबांनी पाळला!

उमेश बांबरे
Saturday, 12 September 2020

कोरोना रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बेडची उपलब्धता होत नाही, तसेच ऑक्सिजन सुविधाही जिल्ह्यात कमी पडू लागली आहे. त्यासाठीच या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 100 रुग्णांकरिता उपचार कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह स्वतंत्र व्यवस्थाही केली असल्याचे संचालक जशराज पाटील यांनी सांगितले.

सातारा : राज्यात सह्याद्री पॅटर्न म्हणून अग्रेसर असलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह शासनाच्या आवाहनाला प्रथम प्रतिसाद देत 150 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. येत्या दोन दिवसात हे सेंटर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सह्याद्रि कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी आज (ता. १२) पत्रकार परिषदेत दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे कोविड सेंटर उभा करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात प्रथमच सह्याद्रीने राबवून कोविडच्या लढाईत सहभाग नोंदविला आहे. सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात या सेंटरची उभारणी केली असून सेंटरच्या उभारणीच्या कामाची पाहणी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी या १० योजना सुरु करा, उदयनराजेंची मागणी

श्री. पाटील म्हणाले, कोरोना रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बेडची उपलब्धता होत नाही, तसेच ऑक्सिजन सुविधाही जिल्ह्यात कमी पडू लागली आहे. त्यासाठीच या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 100 रुग्णांकरिता उपचार कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. सेंटरमध्ये कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, टूथ ब्रश, वाफारा मशीन पुरवण्यात येणार आहेत. सेंटरच्या कामाची पहाणी पणन व सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. 

पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे : अरुण गोडबोले

सह्याद्रीने सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन शासनाच्या आवाहनानुसार सह्याद्री हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती एप्रिलमध्ये सुरू केली. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदींना रुपये शंभर प्रतिलिटर याप्रमाणे विक्रीची व्यवस्था केलेली आहे. आशा सेविका, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी 2000 लिटर सनीटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम अखेरीस ऊसतोड मजुरांकरिता साबण, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तूं उपलब्ध करण्यात आल्या. 

आशांना मानधन वाढीची आशाच; मुख्यमंत्र्यांना साकडे

हंगाम संपताच मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना मास्क हातमोजे देण्यात आले आहे, असे सांगून श्री. पाटील यांनी सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला न घाबरता कणखरपणे सामोरे जावे. अनाठायी भीती बाळगू नये. वेळेत उपचार घेऊन निश्चित बरे होता येते. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, सल्लागार एच. टी. देसाई, बांधकाम अभियंता वाय. जे.  खंडागळे, परचेस अधिकारी जे. डी. घार्गे, कायदेशीर सल्लागार जी. व्ही. पिसाळ, व्ही. जे. शेलार, आर. जी. तांबे उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Center Of 150 Beds At Yashwantnagar Satara News