महाबळेश्वर : इवल्याशा भेकवलीवाडीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अभिजीत खूरासणे
Friday, 18 September 2020

बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना घरातच विलगीकरण करण्यात येत होते. यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवसांत येथे एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाही. 

महाबळेश्वर : योग्य शिस्तीचे पालन केल्याने इवल्याशा भेकवलीवाडीकरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.भेकवलीवाडीत कोरोनाने कहर केला होता. गावात एक बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहा झाली होती. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.

गाव 38 उंबरठ्याचे असून एकूण 252 लोकसंख्या आहे. योग्य शिस्त व ग्रामस्थांनी नियमांचे पालन केले की, नियंत्रण येऊ शकते, हे तेथील नागरिकांनी करून दाखवले. तहसीलदार सुषमा पाटील यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रादुर्भाव कमी झाला. प्रथम सरपंच धोंडिबा केळगणे, तलाठी अविनाश शेडोळकर यांनी गाव सील करून लोकांना गावाबाहेर पडण्यास प्रतिबंध घातले.

चाकेच हालत नसल्याने उपासमारीची वेळ, व्यथा खासगी प्रवासी वाहनचालकांची

गावातील स्वयंसेवकांद्वारे गावात जीवनावश्‍यक वस्तू पुरवल्या जाऊ लागल्या, तसेच गरम पाणी पिणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे, मास्क वापरणे, वाफ घेणे अशा सूचना वेळोवेळी करून त्याची अंमलबजावणी केली. सरपंच धोंडिबा केळगणे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत औषधांचे वाटप केले. आरोग्य सेवक किशोर सूर्यवंशी, आशा सेविका खामकर यांनी गावात रोज सर्व्हे करून नागरिकांची काळजी घेतली. पोलिस पाटील रूपाली केळगणे या गावात बारीकसारीक बाबींवर लक्ष ठेऊन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध घालत होत्या.

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा 

गावातील नागरिकांनी देखील योग्य शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य केले. तलाठी अविनाश शेडोळकर यांनी गावात व्यक्तिगत लक्ष घालून नागरिकांना अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना घरातच विलगीकरण करण्यात येत होते. यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवसांत येथे एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाही. त्यामुळे भेकवलीवाडी गावाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे.

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Free Mahableshwar Bhekawali Village Satara News