esakal | गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा

बोलून बातमी शोधा

Civil Hospital Satara

गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन साइटद्वारे बेडची उपलब्धता दिसण्याची सोय केली आहे; परंतु या साइट अपडेट होत नसल्यामुळे उपलब्ध असलेल्या संख्येप्रमाणे प्रत्यक्ष संबंधित रुग्णालयात बेडच उपलब्ध नसतात. त्यामुळे ही उपाययोजना म्हणजे असून "अडचण अन्‌ नसून खोळंबा' अशी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री योजनांवर समाधान न मानता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून त्यावर खात्रीशीर मार्ग काढण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत तर 1300 पेक्षा जास्त बाधित आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेली बेडची संख्या अपुरी पडत आहे. सातारा शहरात जिल्हा रुग्णालय, जंबो कोविड हॉस्पिटल व मोठ्या संख्येने खासगी दवाखाने असूनही बेडस्‌ उपलब्ध नाहीत. एखादा दुसरा ऑक्‍सिजन बेड मिळाला तर मिळतो; परंतु व्हेंटिलेटर बेड उपलब्धतच होत नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांच्या जिवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणीही जिल्हा प्रशासनाने बेडस्‌ची उपलब्धता केली आहे; परंतु नागरिकांना त्याची माहिती होत नाही.

बेडसाठीची नागरिकांची होणारी धावाधावा टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध बेडची माहिती ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना केली आहे. त्यासाठी covid19satara.in ही वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना बेडची आवश्‍यकता असल्यास या साइटचा उपयोग करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही नागरिकांसाठी एक चांगली सोय होती; परंतु त्याच्या प्रत्यक्ष योग्य अंमलबजावणीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे या साइटचा उपयोग होण्यापेक्षा बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मनस्तापच जास्त होत आहे. साइट वेळेत अपडेट होत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

साइटच्या अशा परिस्थितीमुळे रुग्णालयांना फोन करून नातेवाइकांच्या पदरी निराशाच पडत आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे निर्माण केलेली सेवा योग्य प्रकारे सुविधा देते की नाही याची जिल्हा प्रशासनाने तसदी घेण्याची गरज आहे, तरच कोरोना महामारीचा मुकाबला करण्यात नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

साइट व प्रत्यक्षातील स्थितीत फरक

या साइटवर बेडची लाइव्ह उपलब्धता समजत नाही. बहुतांश हॉस्पिटलची माहितीही आदल्या दिवसाची असते. काहींकडून तर दोन- दोन दिवस माहिती अपडेट केल्याचे दिसत नाही. सकाळी साडेदहा ते बाराच्या दरम्यान अपटेड माहिती असली तरी एकच्या सुमारास बेडबाबत संबंधित रुग्णालयाकडे विचारणा केल्यास एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. आजचीच परिस्थिती पाहिल्यास सकाळी साडेदहाच्या अपडेटनुसार जिल्हा रुग्णालयात 11 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात याबाबत विचारणा केल्यावर व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नव्हता.

साताऱ्यातील चौकाचौकांत नाकाबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई