क्राईम डायरी : खबऱ्यांमुळे पिस्तूल तस्करीची साखळी उद्‌ध्‍वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Diary satara breaks the chain of pistol smuggling four arrested

क्राईम डायरी : खबऱ्यांमुळे पिस्तूल तस्करीची साखळी उद्‌ध्‍वस्त

जळगाव जिल्ह्यातील जामोदा पोलिसांनी केलेल्या वाहन तपासणीत कऱ्हाडच्या चौघांना दोन देशी पिस्तूल व चारचाकी वाहनासह अटक झाली. १७ जून रोजी रात्री उशिरा ही कारवाई झाली. त्यात दोन देशी बनावटीचे पिस्तुलासह मोबाईल व वाहन असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त झाला होता. कऱ्हाड, मलकापुरातील चौघांना त्यात अटक झाली होती. निमखेडी फाट्यावर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंडाची माहिती जळगाव पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांना कळवली होती. कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना त्या सगळ्या बाबींचा शेवटपर्यंत तपास करायचा होता. त्यासाठी त्यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासाची खास परवानगी घेतली.

जळगाव पोलिसांना मदत करण्यासाठी येथून सहायक पोलिस निरीक्षक बाबर व त्यांच्या पथकाची नेमणूक केली. मलकापुरातील पोलिस रेकॉर्डवरील अटकेतील संशयितांनी त्यांना पाहताच भंबेरी उडाली. साऱ्या तपासाची सूत्रे बाबर यांनी हाती घेतली. त्यांच्या कऱ्हाडातील खबऱ्यांनी आधीच माहिती पुरवली होती. पोलिस रेकॉर्डवरील संशयितांचे मोबाईल तपासण्यात आले. त्यातील कॉल डिटेल्स पाहताच पोलिसांना शंका आल्या. त्यासाठी त्यांनी खबऱ्यांना कामाला लावले. त्यांनी काढलेल्या माहितीनुसार त्या मोबाईल क्रमांकाची लिंक मध्यप्रदेशपर्यंत जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली.

पोलिसांनी मध्यप्रदेशाच्या लिंकची मोहिती गोपनीय ठेवत संशयितांकडे तपास सुरू केला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यांच्याकडे सलग ४८ तास तपास केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अकाउंटवरून काही माहिती हाती आली. त्याव्दारे त्यांनी अन्य अकाउंटची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर तेथे छापा टाकून त्यांनाही अटक करण्यात आली. त्या सगळ्या कारवाईने कऱ्हाडच्या टोळीने पोपटासारखी माहिती दिली. या टोळीतील गुंड मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्या टोळीच्या विरोधी टोळीकडे पिस्तूल होती. त्यांच्याकडे आहे, मग आपल्याकडे का नाही, याच खुन्नसवर पिस्तूल खरेदीला गेलेली टोळी गजाआड झाली होती.

चौघांच्या घरची परिस्थिती बेताची

मलकापुरात दोन टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यात मोठी खुन्नस आहे. त्या दोन्ही टोळ्यांतील गुंडांची पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद आहे. त्या दोन्ही टोळ्यांतील गुंडांच्या घरची परिस्‍थिती अत्यंत बेताची आहे. त्यांचे आई-वडील रोजंदारीवर असल्याची पोलिसांची माहिती आहे. काहीही उलाढाल करून फेमस होण्याच्या नादात त्या दोन्ही टोळ्यांत वाद विकोपाला गेल्याचे दिसते. त्यातून एका टोळीने मध्यप्रदेशातूनच तस्करीने पिस्तूल आणले. जळगाव जिल्ह्यात अटक झालेल्या चौघांच्या टोळीचीही तीच अवस्था होती. दोन्ही टोळ्यांनी पाच पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या पोलिसांनी जप्त केल्या. कोल्हापूर पोलिसांनी एक, जळगाव पोलिसांनी दोन, तर कऱ्हाड पोलिसांनी दोन अशी पाच पिस्तूल जप्त केली आहेत.

विरोधातील टोळीने पिस्तूल आणल्याने दुसऱ्याही टोळीने पिस्तूल आणले. तस्करीने आणलेल्या पिस्तूलासह टोळीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे कऱ्हाडसह मलकापुरात कार्यरत असलेल्या दोन्ही टोळ्यांचा पर्दाफाश झालाच, त्याशिवाय पिस्तूल तस्करीचे मध्यप्रदेशपर्यंतचे रॅकेटही पोलिसांना उद्‌ध्वस्त करता आले. कऱ्हाड पोलिसांनी जळगाव पोलिसांना केलेली मदत महत्त्‍वाची ठरली. कऱ्हाड पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क, ऑनलाइन तपासातील पोलिसांची हातखंडा व गुन्हेगारीवर वचकही सिद्ध झाला. पोलिसांनी तपासात वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच पिस्तूल जप्त केल्या. हाती काहीही पुरावा नव्हता, खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनेच पिस्तूल तस्करीच्या रॅकेटचा बुरखा फाटला.

- सचिन शिंदे, कऱ्हाड

Web Title: Crime Diary Satara Breaks The Chain Of Pistol Smuggling Four Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top