माण तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

सल्लाउद्दीन चोपदार
Wednesday, 18 November 2020

सध्या पावसाने उघडीप दिल्याने परिसरात ज्वारी व कांदा पिकाची धूळ वाफ्यावर पेरणी सुरू आहे. वारंवार पेरणी करावी लागत असल्याने बियाण्याच्या व मशागतीच्या खर्चाने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्यातील म्हसवड, दिवड, वरकुटे, पळशी, मार्डीसह परिसरात सध्या कांदा पिकाची दुबार पेरणी सुरू असून जमिनीस चांगला वापसा आल्याने शेतीची कामे जोमात सुरु आहेत. पावसामुळे परिसरातील कांदा पीक कुजून गेल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर बरेच शेतकरी कांदा पिकाची आता तिसऱ्या वेळी पेरणी करत असून बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. 

आता कुठे शेतकरीराजाला चांगला दर आला असताना हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिस्सकावून घेतला असल्याने नाराज झालेल्या शेतकरी पावसाने अधिक संकटात सापडला आहे.परिसरात महिनाभरापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके शेतातच कुजून गेली. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे पाच महिन्याचे गरवा कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते. पण, या वर्षी जून पासूनच सलग पाऊस पडू लागल्याने अनेकांचा कांदा नासला. उगवण झालेला कांदाही कुजून गेला.

वातावरणातील बदलाने रब्बीची पिके धोक्‍यात; पीकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
 
परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाने कांदा सडू लागल्याने शेतात नांगर फिरवला होता. त्यामुळे अर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने परिसरात ज्वारी व कांदा पिकाची धूळ वाफ्यावर पेरणी सुरू आहे. वारंवार पेरणी करावी लागत असल्याने बियाण्याच्या व मशागतीच्या खर्चाने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis Of Double Sowing On Farmers In Maan Taluka Satara News