पावसामुळे खरिपात नुकसान, रब्बीला जीवदान

जालिंदर सत्रे
Tuesday, 20 October 2020

तारळी, मोरणा, उत्तर मांड व दक्षिण मांड व केरा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. आता पूर्ण पाऊस थांबला असून, कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. फक्त पायथा वीजग्रहातून 1050 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इतर पाच मध्यम प्रकल्पांत परिसरातून होणारी आवक फक्त सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग होतो आहे.

पाटण (जि. सातारा) : चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्‍यातील कोयना धरणासह पाच मध्यम प्रकल्प पुन्हा "ओव्हर फ्लो' झाले आहेत. कोयना प्रकल्पामुळे राज्याचा विजेचा प्रश्न व कोयना-कृष्णा काठावरील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. तालुक्‍यातील पाच मध्यम प्रकल्प पुन्हा "ओव्हर फ्लो' झाल्याने प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला बारमाही पाण्याचा दिलासा मिळाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, तर रब्बी व बागायती पिकाला जीवदान देणारा आहे. 

ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणासह तालुक्‍यातील तारळी, उत्तर मांड, मोरणा-गुरेघर, महिंद व मराठवाडी हे मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत होते. सप्टेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने धरण व मध्यम प्रकल्पातून होणारा नदीपात्रातील विसर्ग बंद केला होता. कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी पश्‍चिमेकडे झालेला वापर सोडला तर धरणासह पाच मध्यम प्रकल्प काठोकाठ भरलेले होते. 12 ऑक्‍टोबरपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दोन दिवस कमी प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र, 14 ऑक्‍टोबर रोजी दिवसभर रिमझिम व रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्याचबरोबर पाच मध्यम प्रकल्पही पुन्हा ओसंडून वाहू लागले होते.

माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करा : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम 

तारळी, मोरणा, उत्तर मांड व दक्षिण मांड व केरा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. आता पूर्ण पाऊस थांबला असून, कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. फक्त पायथा वीजग्रहातून 1050 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इतर पाच मध्यम प्रकल्पांत परिसरातून होणारी आवक फक्त सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग होतो आहे. 
चक्रीवादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणासह पाच मध्यम प्रकल्प पुन्हा "ओव्हर फ्लो' झाले. खरिपाच्या काढणीत व्यत्यय व नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामातील आणि बागायती पिकाला जीवदान देणारा योग आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

पर्यटनाचा घ्या मनसोक्त आनंद! महाबळेश्‍वर, पांचगणीतील पॉईंट खुले 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमीच पाऊस! 

सलग दोन वर्षे दोन वेळा धरणे व मध्यम प्रकल्प "ओव्हर फ्लो' झाली. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीचा व कंसात यावर्षी झालेला पाऊस  : कोयनानगर 7336 (4467) मिलिमीटर, नवजा 8393 (5176) व महाबळेश्वरला 7311 (5192) मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत कोयनानगर 2869 मिलिमीटर, नवजात 3217 व महाबळेश्वरला 2119 मिलिमीटर पावसाची नोंद कमी झालेली असली तरी धरण व मध्यम प्रकल्प दोन वेळा ओव्हर फ्लो झाले आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Damage Due To Rains In Patan Taluka Satara News