VIDEO : महाबळेश्वर, पांचगणी पर्यटकांनी बहरले; पर्यटनस्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 21 November 2020

दिवाळी सुट्टी संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर नागरिकांची गर्दी होत आहे.

सातारा : दिवाळी सुट्टी संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर नागरिकांची गर्दी होत आहे. महाबळेश्वर, पांचगणी, तापोळा या पर्यटनस्थळांवर नागरिक बाजारपेठेसह विविध निसर्गरम्य पॉइंट्स फिरण्याचा, सूर्योदय, सूर्यास्त पाहण्याचा, नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत.

व्यावसायिक आणि महाबळेश्वर पालिका यांच्या माध्यमातून पर्यटकांची काळजी घेतली जात आहे. मास्क वापरण्यावर जास्त भर दिला जात आहे. आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) असल्याने पर्यटकांचा ओघ राहील, अशी शक्यता प्रशासनासह व्यावसायिकांनी व्यक्त केली. जगभरात कोरोनाने थैमान माजवल्याने देशात तब्बल तीन महिने लाॅकडाऊन करण्यात आला.  तद्नंतर काही प्रमाणात लाॅकडाऊन शिथिल करत पर्यटन क्षेत्रांना मुभा देण्यात आली. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असून नागरिक पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. 

महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

सध्या महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा क्षेत्र पर्यटकांनी फुलून गेले आहे. पर्यटन क्षेत्राचा आनंद घेत असताना नागरिक प्रशासनाच्या आदेशाचे पालन करताना दिसत आहेत. याबरोबरच महाबळेश्वर पालिकेच्या वतीने पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत, त्यामुळे महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर कोरोनाकाळातही पर्यटकांनी भरुन गेला आहे. घोडे सवारी, बोटिंग या सर्व गोष्टींचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd Of Tourists In Mahabaleshwar Area Satara News