शेतकऱ्यांवर रब्बीच्या दुबार पेरणीचे सावट; पावसाचा धुमाकूळ अद्याप सुरूच

यशवंतदत्त बेंद्रे
Thursday, 29 October 2020

गेली आठ-दहा दिवस परतीच्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात रोजच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत लोटले आहे. अवघा खरीप वाया गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. भुईमूग, ज्वारी उगवली. भात भुईसपाट केले. भिजलेले धान्य शेतकरी रोज उन्हात वाळविण्यासाठी टाकत आहेत. मात्र, रोजच येणाऱ्या पावसाने भुईमूग, ज्वारी व भात वाळविणे देखील कठीण होऊन बसले आहे.

तारळे (जि. सातारा) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिली आहे. या पावसाने खरीप तर घालवलाच; मात्र रब्बीच्या चिंताही वाढविल्या असून दुबार पेरणीचे सावट पसरले आहे. 

गेली आठ-दहा दिवस परतीच्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात रोजच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत लोटले आहे. अवघा खरीप वाया गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. भुईमूग, ज्वारी उगवली. भात भुईसपाट केले. भिजलेले धान्य शेतकरी रोज उन्हात वाळविण्यासाठी टाकत आहेत. मात्र, रोजच येणाऱ्या पावसाने भुईमूग, ज्वारी व भात वाळविणे देखील कठीण होऊन बसले आहे. दसऱ्याच्या सायंकाळीदेखील असाच अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांची वाळवणे भिजली. 

दिवाळी गोड! न्यू फलटण देणार शेतकऱ्यांना पैसे; सभापती रामराजेंची ग्वाही

तारळे विभागात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बीच्या पेरण्या आणखी लांबणीवर पडलेल्या आहेत. सुमारे 50 टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारी व हरभरा पेरण्या झाल्या आहेत. मात्र, प्रमाणापेक्षा जादा झालेल्या पावसाने या पिकांना फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. पिके उगवून आली आहेत. मात्र, जादा पावसाने ती दबली आहेत. बहुतांशी रानात पाणी साठून राहिले आहे. पिके उगवली आहेत. मात्र, आता ऊन पडले तर त्यास मर लागून ती वाया जाणार आहेत, असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशांवर दुबार पेरणीचे सावट आहे. तर उरलेल्या क्षेत्रावर पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे आधीच खरीप वाया गेला आहे तर, रब्बीच्या अडचणीही वाढल्या आहेत. 

खासगी क्‍लासेस संघटनेची साताऱ्यात धरणे; सात महिन्यांपासून क्‍लासेस बंद

रोजच येणाऱ्या पावसाने अडचणीत टाकले आहे. धड वाळवण टाकता येईना, ना धड पेरता येईना, पेरलेल्या शाळू व हरभरा पिकाला पाऊस ज्यादा झाला असून, दुबार पेरणी करावी लागणार असल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. 

-प्रमोद शिंदे, प्रगतशील शेतकरी, घोट 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage To Crops Due To Heavy Rains In Tarle Area Satara News