esakal | ढेबेवाडीत अवकाळीच्या तडाख्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Mango Fruit

ढेबेवाडीत अवकाळीच्या तडाख्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : दरवर्षी हापूस, केशरसह रायवळ आंब्याचे भरघोस उत्पादन घेणारे ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकरी फळ गळतीमुळे चिंतेत आहेत. हवामानातील सततचे बदल आणि कडक ऊन, अवकाळी पाऊस यामुळे झाडांखाली कैऱ्यांचा सडाच पडत असल्याने आंबा उत्पादकांचे आर्थिक गणितच कोलमडण्याची भीती आहे.

पोषक हवामान व आंबा पिकास योग्य जमीन यामुळे ढेबेवाडी परिसरातील शेतकरी आंबा फळबाग लागवडीकडे वळले असून दरवर्षी लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढच होत आहे. डोंगरपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आंब्याच्या बागा असून सपाटीच्या गावांमध्येही फळबागा बहरल्या आहेत. पूर्वी डोंगरी भागात रस्ते व पाण्याची व्यवस्था नसतानासुद्धा शेतकऱ्यांनी डोक्‍यावरून घागरीने पाणी आणून बागा जगविल्या आहेत. बागेतील खत व पाणी व्यवस्थापनासह वणव्यांपासून झाडांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतात.

हापूस, केशर, रत्ना यांसह रायवळ आंब्याने परिसरातील अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार दिला असून त्यांचे वार्षिक आर्थिक गणित याच हंगामावर अवलंबून असते. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फळ गळतीमुळे हे गणित फिस्कटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सुरवातीला धुके, ढगाळ वातावरण, गारपीट, पाऊस आणि त्यानंतर आता कडक ऊन व अवकाळी पाऊस यामुळे यंदा फळ गळती वाढली आहे. लहान व मोठ्या कैऱ्यांचा झाडांखाली अक्षरश: सडाच पडत आहे, असे काळगावचे फळबाग मालक राजू काळे व रुवलेतील रामचंद्र साळुंखे यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale