esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 पाटणमध्ये खरीप उत्पादनात घट

satara : पाटणमध्ये खरीप उत्पादनात घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : पाटण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिकांच्या काढणीस वेग आला आहे. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असून, कमी कालावधीच्या भात पिकांची काढणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जूनपासून नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने या खरीप हंगामात उत्पादनात घट होणार आहे.

खरीप हंगामाची सुरुवात जून महिन्यात चक्रीवादळाने झाली. खरिपासाठी तयार केलेली शेती चाटून गेली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी शेतांची डागडुजी करून खरीप पेरण्या पूर्ण केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली व कोळपणी व भांगलणीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाली आणि ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुसरी आपत्ती कोसळली.

हेही वाचा: साताऱ्यात २८८ विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे

नाले व ओढ्यांनी दिशा बदलल्या आणि हजारो एकर क्षेत्रावर दगड मातीचा भराव साचला. पेरणी केलेली व दमदार आलेली पिके गाडली गेली. दोन दिवसांत होत्याचे नव्हते झाले.

पावसाने चार दिवस हजेरी लावून विश्रांती घेतली. दोन आपत्तीतून वाचलेल्या पिकांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. सलग चार महिने खरीप हंगामातील पिकांनी आपत्तीचा सामना केला. तीन आपत्तीतून वाचलेल्या पिकांची काढणी सप्टेंबरअखेर सोयाबीन काढणीने झाली. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असून, याच काळात वरी, भुईमूग, उडीद, मूग व कडधान्ये पिकांची काढणी शेतकऱ्यांनी उरकून घेतली आहे. सध्या कमी कालावधीच्या भात पिकांच्या काढणीस वेग आला आहे. मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी हार्वेस्टरची मदत घेऊन भाताची काढणी करत आहेत.

loading image
go to top