शिवेंद्रसिंहराजेंवर बरसले 'पवार'!

प्रविण जाधव
Saturday, 12 September 2020

महाविकास आघाडीने धाडसी पाऊल उचलून हद्दवाढीचा निर्णय घेतला आहे. विधानसभा मतदारसंघातील 75 हजार लोकांनी आपल्या विरोधात मतदान केले आहे. कुठल्याही गोष्टीत योगदान नसताना टिमकी वाजवू नका. भाजपमध्ये राहून राष्ट्रवादीच्या तसबिरी लावून जनतेची व पक्षाची दिशाभूल करू नका, अशा शब्दात दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर कडकडीत टिका केली.

सातारा : तब्बल 60 वर्षे खासदारकी, आमदारकी व मंत्रिपदे घरात असूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सातारा पालिकेची हद्दवाढ करता आली नाही. हद्दवाढीचे खरे श्रेय हे महाविकास आघाडीचे आहे. अपयश झाकण्यासाठी मी केले, मी केले असे म्हणून त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पालिकेची हद्दवाढ केल्याबद्दल आमदारसाहेब फलक लावून मोठी कर्तबगारी केल्यासारखे हलगी वाजवत आहेत. हद्दवाढीचे संपूर्ण श्रेय हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडीला आहे. 1971 पासून हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित होता हे आपणच सांगता; परंतु या काळात नगरपालिका, आमदारकी, खासदारकी व मंत्रिपदे आपल्याच घरात होती, तरीही सातारा हे एकमेव शहर राज्यात विकासापासून वंचित राहिले. त्याला आपणच जबाबदार आहात.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केली भूमिका

महाविकास आघाडीने धाडसी पाऊल उचलून हद्दवाढीचा निर्णय घेतला आहे. विधानसभा मतदारसंघातील 75 हजार लोकांनी आपल्या विरोधात मतदान केले आहे. कुठल्याही गोष्टीत योगदान नसताना टिमकी वाजवू नका. सातारकर सुज्ञ नागरिक आहेत. जनतेला गाजर दाखवू नका. औद्योगिक वसाहतीमधील मोठे उद्योग बाहेर का गेले हा प्रश्‍न आहे. औद्योगिक वसाहतीमधील हप्तेगिरी व गुंठेवारीला पहिला चाप लावा मग विकासाचे गाजर दाखवा. भाजपमध्ये राहून राष्ट्रवादीच्या तसबिरी लावून जनतेची व पक्षाची दिशाभूल करू नका. 

अध्यादेश काढा; अन्यथा परिणामाला सामोरे जा; उदयनराजेंचा महाविकास ला इशारा

माझे नुकतेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच ते सातारा शहरात बैठक लावून शहराच्या विकासाबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी येत आहेत. त्या वेळी अनेक गोष्टी मार्गी लावतील. त्यामुळे जनतेची फसवणूक थांबवा, असे आवाहन करताना सातारा पालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढणार असल्याची घोषणाही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Pawar's Criticism On MLA ShivendraSinhRaje Bhosale Satara News