दहा दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्या, अन्यथा आंदोलन; 'रयत क्रांती'चा प्रशासनाला इशारा

हेमंत पवार
Thursday, 12 November 2020

1995 मंजुरी मिळालेल्या टेंभू प्रकल्पास प्रत्यक्षात 2008-9 मध्ये पाणी अडवण्यास प्रारंभ झाला. या वेळी प्रकल्पात अडवलेल्या पाण्याच्या फुगीमुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. प्रशासनाने या शेतीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मोबदला दिला. मात्र, अद्याप अनेक शेतकरी मोबदल्यांपासून वंचित राहिले आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : टेंभू प्रकल्प पाण्यामुळे बाधित झालेल्या नदीकाठच्या शेतीचा गोवारे, सैदापूर, मलकापूर येथील काही शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. तो तातडीने न दिल्यास दहा दिवसांनंतर टेंभू उपसा सिंचन कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने टेंभूचे शाखा अभियंता आर. एस. हडसर यांना निवेदनाद्वारे देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली. 

ते म्हणाले, " 1995 मंजुरी मिळालेल्या टेंभू प्रकल्पास प्रत्यक्षात 2008-9 मध्ये पाणी अडवण्यास प्रारंभ झाला. या वेळी प्रकल्पात अडवलेल्या पाण्याच्या फुगीमुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. प्रशासनाने या शेतीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मोबदला दिला. मात्र, अद्याप अनेक शेतकरी मोबदल्यांपासून वंचित राहिले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी 2010-11 पासून शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला आहे. 

भारतीय जवानांना सॅल्यूट! सुटीवर आलेल्या जवानांकडून सटालेवाडीत देशसेवा

मात्र, अद्याप या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा बाधित शेतकऱ्यांचा सर्व्हे करून जे शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना मोबदला द्यावा. अन्यथा दहा दिवसांनंतर टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.'' याबाबतचे निवेदन श्री. हडसर यांना देण्यात आला. या वेळी श्री. नलवडे, विजय पाटील, राजेंद्र पोळ, प्रफुल्ल कांबळे, हर्षल पोळ, प्रशांत पोळ, राजेंद्र पोळ, आण्णासो पोळ, अमोल पाटील, अनिल पवार, मधुकर पाटील, राजेंद्र पाटील, सयाजी पवार, अधिक पाटील व शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Compensation To Farmers Of Tembhu Scheme Satara News