esakal | खंडाळ्यातील कंपन्या बंद न ठेवल्यास 'आत्मदहन'; अंत्ययात्रेव्दारे प्रशासनाला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

 Khandala Taluka

खंडाळ्यातील कंपन्या बंद न ठेवल्यास 'आत्मदहन'; अंत्ययात्रेव्दारे प्रशासनाला इशारा

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्‍यातील कंपन्या 24 तासांच्या आत 15 दिवसांसाठी बंद कराव्यात, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) वगळता सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा खंडाळा तहसीलदार कार्यालयावर काढून तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन दिले. (Demand For Closure Of Companies In Khandala Taluka For 15 Days Satara News)

दरम्यान, 15 दिवसांसाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व कंपन्या उद्यापासून बंद कराव्यात, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आम्ही सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी या वेळी दिला. आज प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ही अंत्ययात्रा येथील शहरातील शिवाजी चौकापासून खंडाळा तहसीलदार कार्यालयपर्यंत काढण्यात आली. कार्यालयाच्या गेटवर तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी एस. वाय. पवार, चंद्रकांत ढमाळ, रामदास कांबळे व प्रदीप माने यांचीही भाषणे झाली. या वेळी रमेश धायगुडे, अजय धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, अंकुश पवार, राजेंद्र नेवसे, साजीद मुल्ला व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जातीनिहाय आरक्षणाला विरोध; 'समान नागरी कायदा' काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती

या निवेदनात असे म्हटले आहे, की छोटासा तालुका असूनही संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्याचा हॉटस्पॉट बनला आहे. यामध्ये कारखान्यातील तरुण कामगारांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या जमिनी या कंपन्यांना दिल्या. मात्र, याच शेतकऱ्यांची कुटुंब उद्‌ध्वस्त होत असून, कंपनी कामगार या संसर्गजन्य रोगात मृत्युमुखी पडला असल्यास कंपनीने त्या कुटुंबातील एकाला नोकरीस घ्यावे व आर्थिक मदतही करावी. कंपनीने एक अत्याधुनिक सुविधासह कोरोना सेंटर उभारावे व ता. 7 मे ते 23 मेपर्यंत कंपन्या बंद कराव्यात. बंद काळात कामगारांना पूर्ण पगार द्यावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, क्षीरसागर, यादव, पवार व इतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Demand For Closure Of Companies In Khandala Taluka For 15 Days Satara News